Accident : घरी केक घेऊन जाताना अपघात; वाढदिवशीच मुलीवर काळाने घातला घाला

वाढदिवस असल्याने घरात आनंदी वातावरण. मित्र-मैत्रिणींना घरी बोलावलेले... घरात सगळी तयारी झालेली... केक घेऊन येते म्हणून वडिलांसोबत ती घराबाहेर पडली.
Annu Jat
Annu Jatsakal

लातूर - वाढदिवस असल्याने घरात आनंदी वातावरण. मित्र-मैत्रिणींना घरी बोलावलेले... घरात सगळी तयारी झालेली... केक घेऊन येते म्हणून वडिलांसोबत ती घराबाहेर पडली. बेकरीतून केक घेऊन जाताना घर थोड्या अंतरावर असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला.

दोन मोटारसायकलची धडक होऊन जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. नऊ) रात्री घडली. आपल्या मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती घरी कळताच जाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

येथील मांजरा साखर कारखान्याच्या परिसरातील जवानाराम मंगळराम जाट (रा. सोनाहिया, ता. खुलेरी, जि. जयपूर, राजस्थान) हे सीआरपीएफमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तेथेच ते व त्यांचे कुटुंब राहते. त्यांची मुलगी अन्नू जाट (वय १४) ही येथील माउंट लिटेर स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती.

अन्नूचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी मित्र-मैत्रिणींना बोलावून केक कापत हा वाढदिवस साजरा केला जाणार होता. काही मित्र-मैत्रिणी तिच्या घरी जमलेही होते. अन्नू केक घेऊन येण्यासाठी वडील जवानाराम यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून घराच्या बाहेर पडली.

येथील पाच नंबर चौकातून तिने एका बेकरीतून केक घेतला. नंतर मांजरा कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून येणाऱ्या एका मोटारसायकलने जाट यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात अन्नू खाली पडली. त्याचवेळी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर जवळून जात होता. या ट्रॅक्टरचे एक चाक तिच्या अंगावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

‘लवकर या सर्व वाट पाहात आहेत’

या घटनेबाबत अनूच्या घरी काहीच माहिती नव्हती. घरातून ‘लवकर या सर्व वाट पाहात आहेत’, असा फोन गेल्यानंतर घरी हा प्रकार कळाला. त्यानंतर जाट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शासकीय रुग्णालयात तिच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह शनिवारी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर हे कुटुंबीय राजस्थानला गेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com