Motivation News : लातूरच्या अनिरुद्ध कुलकर्णीला ८८ लाख रुपयांचे पॅकेज; बेंगलुरूच्या कंपनीसाठी झाली निवड

दिल्ली आयआयटी येथे शिक्षण घेत असलेला लातूरचा अभियंता अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याची कॅम्पस मुलाखतीतून बेंगलुरु येथील कंपनीसाठी निवड करण्यात आली आहे.
Aniruddha Kulkarni
Aniruddha Kulkarnisakal

लातूर - दिल्ली आयआयटी येथे शिक्षण घेत असलेला लातूरचा अभियंता अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याची कॅम्पस मुलाखतीतून बेंगलुरु येथील कंपनीसाठी निवड करण्यात आली आहे. त्याला निवड केलेल्या कंपनीने वार्षिक ८८ लाखांचे पॅकेज दिले आहे. दिल्ली आयआयटीमधून निवड झालेला आणि सर्वाधिक पॅकेज मिळवलेला अभियंता म्हणून अनिरुद्ध कुलकर्णी याची आता ओळख निर्माण झाली आहे.

लातूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या आयआयटी दिल्ली येथे सध्या तो कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असलेला अनिरुद्ध कुलकर्णी याची कॅम्पस मुलाखतीमधून बेंगलुरु येथील ‘कॉन्टबॉक्स संशोधन केंद्र’ या कंपनीसाठी ‘कोअर अभियांत्रिकी विश्लेषक’ म्हणून निवड झाली आहे.

ता. ८ जुलै २०२४ पासून तो या कंपनीच्या सेवेत रुजू होईल. सदरील कंपनी ही वित्त क्षेत्रात कार्यरत आहे. आयआयटी दिल्ली मध्ये शुक्रवारी (ता. एक) झालेल्या कॅम्पस मुलाखतीमधून सर्वाधिक ८८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवलेला अभियंता म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण येथील श्री किशन सोमाणी विद्यालयातून त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय लातूर, नवोदय विद्यालय कोट्ययम (केरळ) येथून झालेले आहे. जागतिक जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांची संख्या वाढत असताना तब्बल ८८ लाख रुपयांचे पॅकेज मिळवणारा अनिरुद्ध कुलकर्णी याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

५० दिवसांसाठी मिळाले ३२ लाख

अनिरुद्ध कुलकर्णी हा अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना एखाद्या कंपनीत काम करावे लागते. या करिता त्याची नेदरलँड येथील एका वित्त कंपनीत मे २०२३ मध्ये निवड झाली होती. पन्नास दिवस तेथे त्याने काम केले. या करिता कंपनीने त्याला ३२ लाख रुपयाचे पॅकेज दिले होते.

कॅम्पस मुलाखती हा एक चांगला अनुभव असतो. पाहिजे त्या क्षेत्रात पाहिजे त्या कंपनीत नोकरी मिळणे हे महत्त्वाचे असते. आपण जे शिक्षण घेतलेले असते त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. प्रयत्न केले की यश निश्चित मिळते. माझ्यासाठी, कुटुंबीयासाठी आनंदाचा दिवस ठरला आहे.

- अनिरुद्ध कुलकर्णी, विद्यार्थी, आयआयटी दिल्ली

पहिला दिवस, पहिली मुलाखत

दिल्ली आयआयटीमध्ये शुक्रवारपासून विविध कंपनीच्या कॅम्पस मुलाखतींना सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजता मुलाखतीला सुरुवात झाली. त्यात पहिली मुलाखत अनिरुद्ध कुलकर्णी याची होती. त्याने सर्वाधिक पॅकेज मिळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com