रुग्णालयात खाटा वाढविण्यासाठी निधीला मंजुरी द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्योग, व्यवसाय बंद झाले असून भीतीपोटी हे नागरिक गावाकडे येत आहेत.

औसा : औसा विधानसभा मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालये व ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवता यावी याकरिता आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात आमदार श्री. पवार यांनी म्हटले आहे, की औसा मतदारसंघातील अनेक तरुण व नागरिक व्यवसाय व उद्योगांच्या निमित्ताने मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह इतर राज्यांतही आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्योग, व्यवसाय बंद झाले असून भीतीपोटी हे नागरिक गावाकडे येत आहेत. गावात येणाऱ्या या नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केंद्र अर्थात कोरोना कक्ष निर्मिती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

औसा मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालये व नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत खाटांची संख्या मर्यादित आहे. त्यातही प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व इतर रुग्णांसाठी याच खाटा वापराव्या लागतात. त्यामुळे कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी अधिक खाटांची गरज आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात अधिकच्या खाटा उपलब्ध होण्यासाठी बेड खरेदी कराव्या लागणार आहेत. यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करावा.

ही बाब अत्यावश्यक असल्याने तातडीने मंजुरी देऊन खाटा वाढवून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आणीबाणीच्या या परिस्थितीत खाटा कमी पडत असल्याने आरोग्य विभागही हतबल असल्याने आमदारांनी दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे कोरोनाविरोधात चाललेल्या या लढाईला काहीअंशी का होईना बळ मिळाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Approve Funding To Increase Hospital Beds