मनात आलं आणि सायकल यात्रा करत तिरुपती गाठलं...!

विवेक पोतदार
Tuesday, 9 February 2021

सायकलवर स्वारी अन झाली तिरुपतीची वारी, सात दिवसांत तिरुपती प्रवास
 

जळकोट, (जि.लातूर): आले तरुणांच्या मना तेथे कोणाचे चालेना....अशी स्थिती असते. धामणगाव (ता.जळकोट) येथील दहा तरुण मित्र एकत्रित आले अन सायकल प्रवास करत तिरुपती दर्शन यात्रा करण्याचे ठरवले. लगेच तयारी केली एका आठवड्यात तिरुपती गाठले. तिरुपती बालाजी दर्शन करुन ही मित्रमंडळी रविवारी परतही आली आहे.

कोणतेही काम मनात जिद्द ठेऊन करण्याचे ठरवले की ते यशस्वी होते. परिश्रम, कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. तरूणांनी ध्येयवेडे होऊन मनावर घेतले तर कोणतेही काम शक्य होते हे सायकल यात्रा करत तिरुपती दर्शन करत दहा तरूणांनी करुन दाखवले.

Success Story: रंगीत ढोबळी मिरचीने केली किमया, तीन महिन्यांत शेतकऱ्याला मिळाले...

धामणगाव (ता.जळकोट) येथील गोपाळ नागनाथ कल्पले, नामदेव लक्ष्मण राचमाळे, अण्णाराव मुरलीधर मनदुमले, धोडीराम आगलावे, राम उल्पे, अंगद चट, भरत चट, पुंडलीक हालगरे, शंकर ईद्राळे, साई नलाबले यांनी एकत्रित येऊन ही धामणगाव ते तिरुपती ही दर्शन यात्रा सात दिवसांत पूर्ण केली. सोबत एक टेंपो साहित्य घेऊन दिमतीला ठेवला. येताना मात्र त्यांनी यातून परतीचा प्रवास केला.

धामणगाव येथून निघाल्यानंतर उदगीर, मैलार , बगदल, महेबुबनगर, बिचपल्ली, कर्नुल, नंनदियाल, कड्डप्पा, वनटिमिट्टा, राजमपेट, कोडूर, रेनिगु़ंठा अशी मजल दरमजल करत सायकलवर रपेट करत तिरुपतीला पोहंचले.

मनमानी कारभारामुळे भाजप सदस्य नाराज; चाकूर पंचायत समितीत उपसले अविश्वास ठरावाचे...

रस्त्यात प्रवास करताना मैलारचा खंडोबा, बगद्दलची मज्जीद, बिचप्पलीच्या कृष्णा नदी, राम मंदीर, काळगाबुगा येथील आयप्पास्वामी महादेव मंदीर, नंनदीयालचे साई मंदीर, कर्नुलच्या तुगंभद्रानदी, कड्डप्पा येथील बालाजी मंदीर, वनटीमिट्टा येथील राम मंदिर, ननंदलुर येथील बालाजी मंदीर ,कोडुर येथील साई मंदीर, तिरुपती येथील गोविंदाचे, तिरुमल्ला येथील बालाजी, आकाशगंगा, पाताळगंगा, कपाली हनुमान, राम पादुका, त्रिचुर येथील पद्मावती इत्यादी देवस्थानाचे दर्शन घेतले.

विशेष म्हणजे नवनिर्वाचित सरपंच सुनिता कल्पले यांचे पतीही या तरुणात होते. इकडे पाच फेब्रुवारीला ते प्रवासात असताना त्यांच्या पत्नी सुनिता गोपाळ कल्पले यांची धामणगावचे सरपंच म्हणून निवड झाली. ही बातमी आपल्याला प्रवासात असतानाच समजली. असे गोपाळ कल्पले यांनी दै.सकाळशी बोलताना सांगितले. 

उमरग्यातील तुरोरी, गुंजोटी, डिग्गी, व्हंताळ शिवसेनेचे, तर कुन्हाळी,...

ता.२९ जानेवारीला ही मंडळी धामणगावातून सायकलवर स्वार झाली अन ४ फेब्रुवारीला तिरुपती गाठले. गोविंदपठणहून वर मात्र सायकल नेऊ दिली  नसल्याचे त्यांनी सांगितले.  

आम्ही दहा मित्रांनी सायकलवर तिरुपती दर्शन यात्रा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे गावातून निघाल्यानंतर रस्त्यात अनेक ठिकाणी आम्हाला नागरिकांचे सहकार्य मिळाले. जेवणाचे साहित्य सोबतच्या टेंपोत ठेवल्याने अडचण आली नाही. थंडी असली तरी सायकलच्या व्यायामामुळे जाणवली नाही. रस्त्यात आम्ही एकात्मतेचा संदेश देत ही यात्रा सफल केली- गोपाळ कल्पले 

 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news 10 youngsters reach Tirupati by cycling