स्मार्टफोन, गेमिंगमुळे मुलांमध्ये वाढताहेत मानसिक आजार

सुशांत सांगवे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

तुमच्या मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर जात असेल तर मुलांना वेळीच रोखा. कारण मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा, हट्टीपणा, आक्रमकता आणि नैराश्‍यसुद्धा वाढत आहे. मुलांमधील अशा आजाराचे प्रमाण महानगरांप्रमाणेच लातूरसारख्या लहान शहरातही चांगलेच वाढत आहे, असा निष्कर्ष शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील चकरा टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लातूर : तुमच्या मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर जात असेल तर मुलांना वेळीच रोखा. कारण मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा, हट्टीपणा, आक्रमकता आणि नैराश्‍यसुद्धा वाढत आहे. मुलांमधील अशा आजाराचे प्रमाण महानगरांप्रमाणेच लातूरसारख्या लहान शहरातही चांगलेच वाढत आहे, असा निष्कर्ष शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील चकरा टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिवशी भारतात बालदिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून मुलांमध्ये वाढत्या चिडचिडेपणाबद्दल "सकाळ'ने काही मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार म्हणाले, वेगवेगळ्या स्क्रीनसमोर बसण्याचे प्रमाण हल्लीच्या मुलांमध्ये प्रचंड वाढले आहे. त्यात स्मार्ट फोनचा अतिवापर होत आहे. ही कारणे मुलांमधील चिडचिडेपणाला कारणीभूत ठरत आहेत.

मुलांकडील स्मार्ट फोन काढून घेतला की काही मुले शाळेला न जाता चक्क गेमिंग पार्लरमध्ये जाऊन बसत आहेत. मुलांचे सर्व हट्ट वेळेवर पुरवत गेल्यामुळे हल्लीच्या मुलांना "नाही' हा शब्द ऐकायची सवय राहिली नाही. दुसरीकडे मुलांना परीक्षेचा, अभ्यासाचा, स्पर्धेचा ताण येत आहे. त्यातून मानसिक आजार वाढत आहेत. 

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रताप पन्हाळे म्हणाले, की सध्या लहान कुटुंबपद्धती वाढत आहे. त्यामुळे मुलांचे सर्व हट्ट, लाड पुरविले जातात. त्यामुळे नकार ऐकायची सवय लहानपणापासूनच नाहीशी झालेली असते. मग निर्बंध आणायला लागलो की ते चिडचिड करू लागतात. वयामुळेही शारीरिक बदल होतात. त्यातूनही मानसिक अवस्था बदलत जाते. आई-वडिलांचे न ऐकणे, कुटुंबापासून दूर जाणे... अशा गोष्टी मुले करू लागतात.

मुलांमधील वयानुसार होणाऱ्या बदलातून पालक आणि मुलांत संघर्ष सुरू होतो. अशा आजाराचे प्रमाण पूर्वी नव्हते. घरातील व्यक्तींचा मुलांवर धाक असायचा. तो आता राहिला नाही. मैदानावरील खेळाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्यातील ऊर्जा योग्य मार्गी जात नाही. यातून चिडचिडेपणा, अतिखोडकरपणा, अतिचंचलता, अस्थिरता वाढते. बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही (जंकफुड) अशा आजाराला आणि त्यासोबत लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. 

पालकांसाठी टिप्स..

  •  मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा 
  •  त्यांच्या बदलत्या सवयींवर लक्ष ठेवा 
  •  मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा 
  •  खेळण्यासाठी मुलांना मैदानावर न्या 
  •  त्यांना जंकफुड देणे टाळा 
  •  अवांतर पुस्तके वाचण्याची सवय लावा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur Children irritated by increasing screen time