Delta In Latur : लातुरात मालदीव रिटर्न प्रवाशाला 'डेल्टा'ची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delta plus varient
Latur : लातुरात मालदीव रिटर्न प्रवाशाला 'डेल्टा'ची लागण

Delta In Latur : लातुरात मालदीव रिटर्न प्रवाशाला 'डेल्टा'ची लागण

लातूर : दुबईहून आलेल्या प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर मालदीवहून आलेल्या प्रवाशाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रवाशाचा अहवाल गुरूवारी (ता.१६) सकाळी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने पाठवला असून त्यानुसार या प्रवाशाचा ओमिक्रॉनचा (Omicron) अहवाल निगेटिव्ह आला असून त्याला डेल्टाची लागण (Delta Variant) झाली आहे. ओमिक्रॉनपूर्वीच डेल्टा व्हेरीएंटचे आगमन झाले होते. मात्र, या व्हेरीएंटची लागण झालेला रूग्ण जिल्ह्यात आढळला नव्हता. मालदीव (Maladives) रिटर्नच्या निमित्ताने लातुरात पहिल्यांदाच डेल्टा आला आहे. हा व्हेरीएंट सर्वसाधारण कोरोनासारखाच (नॉर्मल) असल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी याला दुजोरा दिला. जिल्ह्यात (Latur) परदेशातून प्रवास करून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. (Latur Corona Updates Maldives Return Passenger Infected Delta Variant)

हेही वाचा: Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या

जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी सहापर्यंत १४७ प्रवाशी आले असून गुरूवारी २५ नवीन प्रवाशी दाखल झाले आहेत. यापैकी १३८ प्रवाशांचा संपर्क झाला असून त्यापैकी १२६ प्रवाशांची कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. यातील ९७ प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तर दोन पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी दुबईहून एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून १० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आलेल्या मालदीवहून आलेल्या प्रवाशाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरूवारी सकाळी आला असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला कोरोनाच्या डेल्टा व्हेरीएंटची लागण झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर डेल्टा व्हेरीएंटची साथ आली होती. त्याची जगभर चर्चा झाली. मात्र, या व्हेरीएंटचा रूग्ण जिल्ह्यात आढळून आला नव्हता. मालदीव रिटर्न प्रवाशाच्या निमित्ताने जिल्ह्यात आधी ओमिक्रॉन व नंतर डेल्टा आल्याने आरोग्य विभागाला सकाळी चांगलाच ताण आला होता.

हेही वाचा: Parbhani : गूढ आवाजाने गोदाकाठ हादरला, सोनपेठमधील नागरिक भयभीत

डेल्टा नॉर्मल व्हेरीएंट

डेल्टा अहवाल आल्याने आरोग्य विभागाने त्याच्या प्रभावाची तसेच परिणामकारिकतेची खातरजमा वरिष्ठ कार्यालयाकडून करून घेतली. त्यानुसार डेल्टा हा नॉर्मल व्हेरीएंट असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी याला दुजोरा दिला. दरम्यान जिल्ह्यात दाखल ११ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा संपर्क होत नसून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मालदीव रिटर्न प्रवाशाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला आहे. या प्रवाशाची दहा दिवसानंतर पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. वडगावे यांनी सांगितले.

टॅग्स :Delta