esakal | लातूरच्या व्यापाऱ्याचा ४३ शेतकऱ्यांना गंडा, सव्वादोन कोटींची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Crime News

या सर्व शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपये असून, या सर्वांची फसवणूक झाली आहे. या बाबत देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लातूरच्या व्यापाऱ्याचा ४३ शेतकऱ्यांना गंडा, सव्वादोन कोटींची फसवणूक

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून येथील एका व्यापाऱ्याने ४३ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. नऊ) गुन्हा दाखल करण्यात आला. येथील व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हा डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तानाजी निवृत्ती देवकर (रा. देवळाली, ता. कळंब) यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले.

त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. परंतु, ते बँकेत वटले नाहीत. त्यानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्याकडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. परंतु, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्या सारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले. या सर्व शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपये असून, या सर्वांची फसवणूक झाली आहे. या बाबत देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील पुजारी तपास करीत करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर