लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुसले बेंच, रांगेत ताटकळत उभा असलेल्या मतदारांना केली बसण्याची व्यवस्था

विकास गाढवे
Tuesday, 1 December 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता.एक) येथील केशवराज विद्यालयातील केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी प्रचंड उत्साह दाखवत रांगा लावल्या. यात शारीरिक अंतरामुळे रांगेची लांबी वाढून मतदान केंद्राच्या बाहेर गेली.

लातूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता.एक) येथील केशवराज विद्यालयातील केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी प्रचंड उत्साह दाखवत रांगा लावल्या. यात शारीरिक अंतरामुळे रांगेची लांबी वाढून मतदान केंद्राच्या बाहेर गेली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी मतदानासाठी केंद्राला भेट दिल्यानंतर अनेक ज्येष्ठ मतदार रांगेत ताटकळल्याचे त्यांना दिसले. या मतदारांना तातडीने बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मात्र, बीएलओंनी शिपाई नसल्याचे कारण पुढे असमर्थता दाखवली. त्यानंत श्रीकांत यांनी स्वतः पुढे येत बाकडे (बेंच) टाकले व बेंचवरील धुळही पुसली. यामुळे मतदान केंद्रावरील धावपळ उडाली. काही क्षणांत मतदारांना बसण्याची व्यवस्था झाली व ताटकळलेल्या मतदारांना चांगलाच दिलासा मिळाला.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळी आठपासून मतदानाला सुरवात झाली. केशवराज माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत तीन मतदान केंद्र असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी तोबा गर्दी करत रांगा लावल्या. याच केंद्रावर जिल्हाधिकारी श्रीकांत यांचेही मतदान होते. सकाळी साडेदहा वाजता ते मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना मतदारांची गर्दी दिसली. कोरोनामुळे मतदानासाठी केलेल्या फिजिकल डिस्टन्शींगच्या नियमांमुळे मतदारांच्या दूर अंतरावर रांगा लागल्या होत्या. एका केंद्राची रांग तर केंद्राबाहेर आली. रांगेत अनेक मतदार साठ वर्षापुढील होते. हे पाहून श्रीकांत यांनी केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) पाचारण केले. त्याला रांगेतील मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मात्र, बीएलओ कर्मचाऱ्याने त्यासाठी शिपाई कर्मचारी नसल्याची सबब पुढे केली.

त्यानंतर श्रीकांत यांनी स्वतः पुढे येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बेंच बाहेर काढण्यास सुरवात केली. बेंचवरील धुळही त्यांनी कपड्याने पुसली. श्रीकांत स्वतः शिपायाचे काम असल्याचे पाहून मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. सर्वांनीच मग बेंच काढून पुसण्याचे काम केले. शिपाई कर्मचारीही धावून आले. काही क्षणातच मतदारांना चकाचक बेंचची व्यवस्था झाली व तासाभरापासून ताटकळलेले मतदार बेंचवर विसावले. यामुळे मतदारांना दिलासा मिळाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थेसाठी केलेल्या धडपडीचे कौतुक वाटले.

मतदान प्रक्रियेला दिला वेग
केंद्रातील मतदान प्रक्रिया मंद गतीने सुरू होती. परिस्थिती पाहून केंद्राध्यक्षांनी अतिरिक्त साहित्य व जादा मनुष्यबळाची मागणी केली नसल्याचे श्रीकांत यांच्या लक्षात आले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नव्हते. मतदार व कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करूनही त्याची माहिती कोणालाच नव्हती. यामुळे श्रीकांत चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सर्वांची चांगलीच हजेरी घेतली. मतदान केंद्रात स्वतः जाऊन प्रक्रियेला वेग दिला. यामुळे रांगेतील मतदारांची संख्या वेगाने कमी होऊ लागली.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Collector Clean Bench For Voters Aurangabad Gradaute Election