Aurangabad Graduate Election Update : लातूर जिल्ह्यात दोन तासांत ७.६२ टक्के झाले मतदान

हरी तुगावकर
Tuesday, 1 December 2020

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात लातूर जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे.

लातूर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरुच असल्याने या मतदानसाठी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची थर्मल स्क्रिनिंग करून सॅनिटायझर व मास्क घालूनच मतदान केंद्रात पाठवण्यात येत आहे. जिल्ह्यात ८८ मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात एकूण मतदार ४१ हजार १९० आहेत. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या दोन तासात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. दोन हजार ७७७ पुरुष व ३६१ स्त्री अशा एकूण तीन हजार १३८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांची थर्मल गनच्या साहाय्याने तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात आहे. सॅनिटायझरचाही वापर केला जात आहे. तसेच ज्या मतदारांनी  मास्क आणले नाहीत, अशा मतदारांना प्रशासनाच्या वतीने मास्कचाही पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे शिरीष बोराळकर यांच्या खरी लढत होत आहे. यात आणखी ३२ उमेदवारही आपले नशीब अजामावत आहेत. प्रमुख दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान कसे करून घेता येईल या करीता सकाळपासूनच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduate Constituency Election Update