esakal | शेतात वृक्षारोपण करून केले वडिलांच्या अस्थींचे विसर्जन

बोलून बातमी शोधा

Ujani
शेतात वृक्षारोपण करून केले वडिलांच्या अस्थींचे विसर्जन
sakal_logo
By
केतन ढवण

उजनी (लातूर): पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी येथील जाधव कुटुंबीयांकडून मृत वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थींचे वृक्षारोपण करत शेतातच विसर्जन करण्यात आले. जाधव कुटुंबीयांनी जुन्या रुढी-परंपरेला फाटा देत पर्यावरणपूरक निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

उजनी (ता. औसा) येथील हॉटेल व्यावसायिक ज्ञानदेव जाधव (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (ता.२६) निधन झाले. ६० वर्षापूर्वी त्यांनी येथील सुप्रसिद्ध बासुंदीचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ते सायकलवर परिसरातील खेड्यापाड्यातून गाई व म्हशीचे गावरान दूध संकलन करायचे. येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या बासुंदीची गोडी वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

हेही वाचा: सामाजिक बांधिलकी! दफनविधीसाठी कब्रस्तानात चोवीस तास सेवा

दरम्यान बुधवारी (ता.२८) ज्ञानदेव जाधव यांचा तिसऱ्या दिवशीचा विधी होता. या दिवशी त्यांची रक्षा व अस्थी कुठल्याही नदी किंवा विहिरीच्या पाण्यात न टाकण्याचा निर्णय त्यांचा मुलगा सुभाष जाधव व नामदेव जाधव यांनी घेतला. या जुन्या परंपरेला नाकारून जाधव कुटुंबीयांनी त्यांच्या शेतात चार आंब्याची झाडे लावून त्यांच्या बुडात रक्षा व अस्थींचे विसर्जन केले.

हेही वाचा: स्कोअर १५, रुग्णालयाचा नकार, तरी भीमाबाईंनी केला कोरोनाचा प्रतिकार!

नदी किंवा विहिरीच्या पाण्यात मृत व्यक्तीचे अस्थी विसर्जन करण्याची प्रथा जवळपास सगळीकडे आहे. असे न करण्याबाबत शासनाकडून ही वारंवार सांगण्यात येते. परंतु अद्यापही लोकांकडून याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळते. परिणामी पाणी दूषित होऊन जलप्रदूषण होते. हीच बाब पर्यावरणआचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरते. हे टाळण्यासाठी हा जुना पायंडा मोडीत काढून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे सुभाष जाधव यांनी सांगितले.