बनावट एक्‍स्चेंजची माहिती 'यू ट्यूब'वरून काढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुख्य संशयिताची कसून चौकशी; आणखी एकाला अटक

मुख्य संशयिताची कसून चौकशी; आणखी एकाला अटक
लातूर - लातूर बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील नवनवीन माहिती आता पुढे येऊ लागली आहे. अशा बनावट एक्‍स्चेंजच्या काही साइट्‌स आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या हैदराबादच्या फैज महंमद याने या यंत्राची माहिती "यू ट्यूब'वरून घेतली असल्याची माहिती उजेडात आली आहे. फैज महंमद हा कुवेतमध्ये चार-पाच वर्षे राहिला असल्याचेही समजते. या प्रकरणात वलांडी येथील एका संशयिताने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, एक फरारी आहे. यातील संशयित आरोपी काहीही माहिती सांगत असले तरी, दहशतवादविरोधी पथक व स्थानिक पोलिस वेगवेगळ्या पद्धतींनी तपास करीत आहेत. लातूरमध्ये बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजचे प्रकरण लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या दक्षतेमुळे उघडकीस आले. त्यानंतर "एटीएस' व स्थानिक पोलिसांनी ठिकठिकाणी छापे घातले. लातुरातील दोन एक्‍स्चेंजमधून केंद्र सरकारला 15 कोटी रुपयांना फसविल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी लातूरमधून दोन, सोलापूरमधून एक, हैदराबादमधून दोघे अशा पाच जणांना अटक केली होती. यात पहिल्या दिवशी पोलिसांनी वलांडी येथे छापा घालून एक यंत्र, सिमकार्ड जप्त केले होते; पण यातील संशयित आरोपी मात्र फरारी होता. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वलांडी येथील महेश मळभागे हा पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला तसेच पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या शंकर बिरादार या दोघांना आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला

या प्रकरणात हैदराबादचा फैज महंमद प्रमुख संशयित आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. फैज हा नोकरीनिमित्त चार- पाच वर्षे कुवेतमध्ये होता. हार्डवेअरचे त्याला ज्ञान असल्याचे समोर येत आहे. यात त्याने बनावट एक्‍स्चेंजची माहिती "यू ट्यूब'वरून काढली असल्याचे तो सांगत आहे. देशभरात अनेक ठिकाणी याचे जाळे पसरल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

हैदराबादला पथक जाणार
फैज महंमद सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याला घेऊन पोलिसांचे पथक हैदराबादला लवकरच जाणार आहे. तेथे आणखी काही माहिती मिळते का? याचा तपास केला जाणार आहे. या एक्‍स्चेंजच्या माध्यमातून कमाई करण्यात आलेल्या पैशाची विल्हेवाट कोठे लावली, याचाही तपास केला जाणार आहे.

Web Title: latur marathwada news bogus exchange information on youtube