पहिली मुलगी जन्मलेल्या कुटुंबांची ट्रॅकिंग करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

लातूर - पहिली मुलगी जन्माला आलेल्या कुटुंबांत जन्मलेल्या दुसऱ्या अपत्याची जन्मतारीख व ठिकाणाच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात. अशा कुटुंबांतील अपत्यांचे योग्य पद्धतीने ट्रॅकिंग करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

लातूर - पहिली मुलगी जन्माला आलेल्या कुटुंबांत जन्मलेल्या दुसऱ्या अपत्याची जन्मतारीख व ठिकाणाच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात. अशा कुटुंबांतील अपत्यांचे योग्य पद्धतीने ट्रॅकिंग करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते.  जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत नोंदणी झालेल्या सर्व सोनोग्राफी केंद्रावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही सोनोग्राफी केंद्रावर स्त्रीभ्रूणहत्येसारखा गैरप्रकार होत असल्याचे आढळून आल्यास त्या केंद्रावर कारवाई करावी. 

जिल्ह्यात पुरुषामागे महिलांचे प्रमाण समाधानकारक नाही. ज्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आली आहे, अशा कुटुंबांवर लक्ष ठेवावे. या कुटुंबांत जन्माला आलेल्या दुसऱ्या अपत्याचे योग्य पद्धतीने ट्रॅकिंग करावे. सोनोग्राफीसोबत एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करावी.’’  

जिल्ह्यात १४२ सोनोग्राफी केंद्रे असून त्यांची नियमित तपासणी करण्यात येते. मध्यंत्तरी जिल्ह्यातील नोंदणीकृत साडेचारशेहून अधिक नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या ९२ नर्सिंग होमना कारणे दाखवा नोटिसा दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. एस. दुधाळ यांनी सांगितले. २०१५ - २०१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एक हजार पुरुषामागे ९४९ महिला, असे स्त्री- पुरुष गुणोत्तर होते. सध्या ते जिल्ह्यात एक हजार पुरुषामागे ९५३ महिला असे प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले.

पोर्टलवरूनच जन्म, मृत्यूचे दाखले
जन्म व मृत्यूच्या नोंदणीसाठी सरकारने वेबपोर्टल सुरू केले असून आता नागरिकांना www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावरच जन्म व मृत्यूची नोंदणी करून ऑनलाईन प्रमाणपत्र घेणे बंधनकारक झाले आहे. पोर्टलवरील नोंदीवरूनच ऑनलाईन जन्म व मृत्यूचा दाखला देण्यात येणार आहे. त्यासाठी जन्म व मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन करण्यात येत असून जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांचे काम मंदगतीने सुरू आहे. या कामाला वेग द्यावा व नागरिकांना ऑनलाईन प्रमाणपत्र द्यावीत व अनधिकृतपणे हस्तलिखित प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी बैठकीत दिले.

Web Title: latur marathwada news Track the first daughter-borne families