
लातूर : आदेश नसल्याने महापालिका संभ्रमात
लातूर : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०१७ सारखीच चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयानुसार महापालिकेत अठरा प्रभाग राहतील. पण या संदर्भात ना राज्य शासनाचे ना राज्य निवडणूक आयोगाचे आदेश गुरुवारी सायंकाळपर्यंत आलेले नव्हते. त्यामुळे संभ्रम कायम आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. पाच) महापालिकेची आरक्षण सोडत आहे. त्याची जय्यत तयारी महापालिकेने सुरू केली असून गुरुवारी दिवसभर याचे प्रात्याक्षिक संबंधीतांना देण्यात येत होते.
महाविकास आघाडीने राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना केली होती. यानुसार महापालिकेचे २७ प्रभाग होणार होते. व ८१ सदस्य राहणार होते. यानुसार त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला. त्यावर आक्षेप मागवण्यात आले. त्याच्यावर सुनावणीही घेण्यात आली. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली. त्यानंतर आगामी निवडणुकीसाठी मतदार याद्याचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. ता. दोन सप्टेंबरपर्यंत मतदार याद्याही अंतिम केल्या जाणार आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर केला. यानुसार महापालिकेत शुक्रवारी (ता. पाच) आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने बुधवारी महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. पण या संदर्भात राज्य शासनाने किंवा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचे आदेश काढले नव्हते. त्यामुळे संभ्रम कायम राहिला. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.पाच) होणाऱ्या आरक्षणाची सोडतीची महापालिकेत जय्यत तयारी मात्र सुरू होती. मात्र आदेश आल्यानंतर काम थांबेल असेही चित्र असल्याने नेमके काय होणार हे शुक्रवारीच समजणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. पण या संदर्भात गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आयोगाच्या पूर्वीच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. पाच) आरक्षण सोडत निघणार आहे. रात्रीतून काही आदेश आले तर मात्र पुढील निर्णय घेतला जाईल.
- अमन मित्तल, आयुक्त, महापालिका, लातूर