स्वरांतून घडले वैकुंठनायकाचे दर्शन...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

लातूर : तरुणाईच्या ह्रदयावर अधिराज्य गाजविणारे तीन गायक एका स्वरमंचावर आले. तिघांचे गुरू वेगवेगळे. घराणे वेगवेगळे आणि शैलीही वेगवेगळी. त्यांच्या वेगवेगळ्या शैलीतील आणि वेगवेगळ्या स्वरातील भक्तीगीते सादर होत असताना स्वरमंदिरात 'वैकुंठनायका'चेच दर्शन श्रोत्यांना घडले.

लातूर : तरुणाईच्या ह्रदयावर अधिराज्य गाजविणारे तीन गायक एका स्वरमंचावर आले. तिघांचे गुरू वेगवेगळे. घराणे वेगवेगळे आणि शैलीही वेगवेगळी. त्यांच्या वेगवेगळ्या शैलीतील आणि वेगवेगळ्या स्वरातील भक्तीगीते सादर होत असताना स्वरमंदिरात 'वैकुंठनायका'चेच दर्शन श्रोत्यांना घडले.

ते तीन गायक म्हणजे पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे, संगीतमार्तंड जसराजजी यांचे शिष्य पं. संजीव अभ्यंकर आणि किशोरी अमोणकर यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर. ते लातूरातील संगीत मैफलीत प्रथमच एका स्वरमंचावर आले होते. श्री जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळाने ही मैफल आयोजित केली होती. फारसे कधी न ऐकलेले अभंग अत्यंत सुरेल स्वरात सादर करून त्यांनी लातूरकरांना अविस्मरणीय अनुभव दिला.

पं. अभ्यंकर यांनी ‘नमो ज्ञानेश्वरा’ या अभंगाने मैफलीची सुरवात केली. पहिल्याच अभंगाने स्वरमंदीरातील वातावरण भक्तीमय झाले. त्यानंतर भाटे यांनी ‘विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा’ तर पणशीकर यांनी संत चोखामेळा महाराज यांचा ‘अनादी निर्मळ’ हा अभंग सादर केला. पुढे अभ्यंकर आणि पणशीकर यांनी आपल्या स्वरांनी ‘मन हे राम झाले’ हा अभंग रंगवला तर भाटे यांनी संत तुकाराम यांचा ‘संसाराच्या अंगी अवघीच व्यसने’ हा अभंग सादर करून त्यात रंग भरले. ‘वैकुंठनायका’ हा अभंग सादर करून तिघांनी कळसच गाठला.

मैफलीच्या दुसऱ्या टप्प्यात ‘ध्यान लागले रामाचे’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गाजलेले अभंग सादर करून त्यांनी श्रोत्यांना भक्तिरसाची अनुभूती दिली. त्यांना भरत कामत (तबला), जीवन धर्माधिकारी (हार्मोनिअम), उद्धव कुंभार (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखवाज) यांनी समर्पक साथ केली. त्यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. या वेळी महापौर सुरेश पवार, जानाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. आरती संधिकर, सचिव सारंग आयाचित, प्रतिष्ठानचे अतूल ठोंबरे उपस्थित होते. स्वर्णिमा बाठे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: latur music program