
रत्नागिरी ते नागपूर रस्त्यावरील आैसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थलांतरीत झाला असून यास ३६१ क्रमांक देण्यात आला आहे
चाकुर (लातूर): औसा - लातूर - चाकूर - अहमदपुर - नांदेड ते वारंगाफाटा या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होते. आता ते काम २९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डेही तातडीने बुजविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुनिल पाटील यांनी दिली आहे. चापोली (ता.चाकूर) जवळ राष्ट्रीय महामार्गाची बुधवारी (ता.२०) त्यांनी पाहणी केली.
रत्नागिरी ते नागपूर रस्त्यावरील आैसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थलांतरीत झाला असून यास ३६१ क्रमांक देण्यात आला आहे. रस्ताच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आली असून यातील काही शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आलेला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपुर्वी सुरु झाले होते. परंतू काही दिवसानंतर हे काम बंद करण्यात आले होते. या रस्त्यावर मोठे - मोठे खड्डे पडले असून ते बुजविण्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोल्हापूरचे सीईओ अमन मित्तल लातूर महापालिकेचे नवे आयुक्त, देविदास टेकाळेंची बदली
रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकल्प संचालक श्री. पाटील यांनी सदरील रस्त्याची पाहणी केली पुर्वीच्या कंत्राटदाराकडील काम रद्द करण्यात आले असून नवीन कंत्राटदाराकडून २९ जानेवारी पासून रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु केले जाणार आहे.
१८८ किलोमिटरच्या या रस्त्यावर लातूर ते चाकूर, अहमदपुर ते लोहा, नांदेड ते वारंगाफाटा दरम्यान तीन टोलनाके राहणार आहेत. रस्त्याच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून काम केलं जाणार असून ५० वर्षे तरी रस्त्याला काही होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
बीडच्या अंबाजोगाईत चक्क झळकले कुत्र्याला शुभेच्छा देणार बॅनर, मग होऊ द्या चर्चा!
लातूररोड येथील रेल्वे पुल, मांजरा नदीवरील पुलासह इतर ठिकाणच्या पुलाचे कामही तातडीने सुरु होणार असून दोन वर्षाच्या आत रस्त्याचे काम पुर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचे प्रयत्न असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. लातूर ते चाकूर दरम्यानचे खड्डे बुजविण्यात आले आहेत लोहा ते चापोली पर्यंतचे काम ही चार दिवसात पुर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
(edited by- pramod sarawale)