कोल्हापूरचे सीईओ अमन मित्तल लातूर महापालिकेचे नवे आयुक्त, देविदास टेकाळेंची बदली

हरी तुगावकर
Wednesday, 20 January 2021

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त एम.डी.सिंह यांची बदली झाल्यानंतर मे २०२० मध्ये नाशिक येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले देविदास टेकाळे येथे आयुक्त म्हणून आले होते.

लातूर : लातूर महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमन मित्तल येत आहेत. श्री. मित्तल हे आयएएस अधिकारी आहेत. कोरोनाच्या काळात आलेले श्री.टेकाळे यांची कोरोना संपण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त एम.डी.सिंह यांची बदली झाल्यानंतर मे २०२० मध्ये नाशिक येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले देविदास टेकाळे येथे आयुक्त म्हणून आले होते. त्यावेळेस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात राहिला. श्री.टेकाळे यांचा सर्व कार्यकाळ हा कोरोनातच गेला. पण श्री.टेकाळे हे कार्यालयात बसत नाहीत. कामे तातडीने केली जात नाहीत अशा तक्रारी नगरसेवकांच्या होत्या.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

पालकमंत्री अमित देशमुख यांचीही त्यांच्यावर एक प्रकारे नाराजी होती. यातूनच श्री. टेकाळे यांची दहा महिन्यांच्या आतच बदली करण्यात आली आहे. अद्याप त्यांना पोस्टिंग देण्यात आली नाही. आता अमन मित्तल हे लातूर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. श्री. मित्तल हे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते आयएएस अधिकारी आहेत. बुधवारी (ता.२०) अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. श्री. मित्तल लवकरच ते रुजू होण्याची शक्यता आहे.  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aman Mittal New Municipal Corporation Commissioner Latur Latest News