मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे तीनतेरा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

लातूर - राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या दौऱ्यावर जात असताना त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर सुस्थितीत आहे की नाही, हे पाहणे आवश्‍यक असते. ते कोठे उतरविले जाणार आहे, ती जागादेखील गर्दीचे ठिकाण असू नये, हेलिपॅडची निगराणी राखणे असे संकेत आहेत; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यात मात्र सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे खाली उतरवीत असताना हा अपघात झाला. या अपघातातून फडणवीस यांच्यासह सहा जण मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला.

तांत्रिक बिघाडाचे कारण
मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते शासनाच्या "व्हीटी-सीएमएम' या हेलिकॉप्टरने आले होते. याच हेलिकॉप्टरने ते उड्डाण करीत असताना अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर 50 ते 60 फूट उंच गेल्यानंतर "एअर प्रेशर' कमी होऊ लागले. हा तांत्रिक बिघाड असल्याचे पायलट संजय कर्वे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ते खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यात ते खाली कोसळले. हेलिकॉप्टर सुस्थितीत आहे की नाही, याकडे आधीच लक्ष देणे आवश्‍यक होते.

हेलिपॅडच्या निगराणीकडे दुर्लक्ष
निलंगा येथे शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते. प्रत्येक व्हीआयपीसाठी याच हेलिपॅडचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. पण हे गर्दीचे ठिकाण आहे. गर्दीच्या ठिकाणी हेलिपॅड नसावे, असे संकेत आहेत. या हेलिपॅडची निगराणीही केली गेली नव्हती. त्यामुळे हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच मोठा धुराळा उडाला. पाणीही मारले नव्हते.

ट्रान्स्फॉर्मर अन्‌ 11 केव्हीची लाइन
या हेलिपॅडच्या परिसरात महावितरणचा एक ट्रान्स्फॉर्मर आहे. तसेच मैदानाच्या परिसरातूनच 11 केव्हीची लाइनही गेली आहे. पायलटने हेलिकॉप्टर खाली घेत असताना या लाइनच्या तारेला पंखा लागला, त्यामुळे हेलिकॉप्टर दिशा भरकटत खाली कोसळले. ट्रान्स्फॉर्मरचे व हेलिकॉप्टरचे अंतर खूपच कमी होते. हे हेलिकॉप्टर ट्रान्स्फॉर्मरवर आदळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. ट्रान्स्फॉर्मरच्या परिसरात हेलिपॅड कशाला केला, हाही प्रश्‍न निर्माण होत आहे.

नाईट लॅंडिंगची सुविधा हवी
या अपघातातून धडा घेऊन या पुढील काळात प्रशासनाने सावध राहणे आवश्‍यक आहे. लातूर येथे विमानतळ आहे. तेथे हेलिकॉप्टर उतरू शकते. विमानतळापासून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर अर्ध्या तासांत व्हीआयपी व्यक्ती जाऊ शकते. त्यामुळे या पुढील काळात व्हीआयपीसाठी कोठेही हेलिपॅड तयार करण्यापेक्षा विमानतळाचा वापर करण्याची गरज आहे. तसेच विमानतळाला नाईट लॅंडिंगची सोय असेल, तर व्हीआयपी विमानांनीही येऊ शकतात. काही वर्षांपूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून तातडीने मंजुरी घेऊन येथील विमानतळावर नाईट लॅंडिंग करून गोपीनाथ मुंडे यांना मुंबईला हलविले होते. त्यानंतर नाईट लॅंडिंगची सुविधा नियमित करण्याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. ही सुविधा या पुढेही उपलब्ध होण्याची गरज आहे.

Web Title: latur news chief minister security problem