हैदराबादच्या दोघांसह सोलापूरच्या एकाला कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

लातूर - येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजप्रकरणी हैदराबाद येथून अटक करण्यात आलेल्या दोघांसह सोलापूरहून ताब्यात घेतलेल्या एकाला ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथून आणलेल्या दोघांची दहशतवादविरोधी पथक; तसेच स्थानिक पोलिसांनीदेखील कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संबंध आला आहे का? हे पाहिले जात आहे. 

लातूर - येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजप्रकरणी हैदराबाद येथून अटक करण्यात आलेल्या दोघांसह सोलापूरहून ताब्यात घेतलेल्या एकाला ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथून आणलेल्या दोघांची दहशतवादविरोधी पथक; तसेच स्थानिक पोलिसांनीदेखील कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संबंध आला आहे का? हे पाहिले जात आहे. 

लातुरात तीन दिवसांपूर्वी दोन बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणले होते. यात रवी साबदे व शंकर बिरादार या दोघांना अटक करण्यात आली होती. यात हे दोघेही ता. 22 जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर रविवारी आणखी एक एक्‍स्चेंज पोलिसांनी उघडकीस आणले होते. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हैदराबाद कनेक्‍शन उघडकीस आणले. यात पोलिसांनी हैदराबाद येथून फैज महंमद व इम्रान महंमद रशीद या दोघांना अटक करून आणले होते; तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर येथे छापा टाकून सुदामन दगडू घुले (वय 40, रा. कुमार चौक, रेल्वेलाइन, सोलापूर) याला अटक करून येथे आणले. या तिघांनाही सोमवारी (ता. 19) न्यायालयासमोर उभे केले असता, ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यात त्यांना बनावट एक्‍स्चेंजसाठी वापरली जाणारी मशीन ही सोलापूरच्या सुदामन घुले याने बसवून देऊन तांत्रिक माहिती दिल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अंगद कोतवाड, रामदास नाडे, बालाजी जाधव, नागनाथ जांभळे, कुर्रम काजी, अभिमन्यू सोनटक्के यांनी सोलापूर येथे जाऊन कुमार चौकातील घुले याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करून आणले होते. त्यालाही न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

लातुरात बनावट एक्‍स्चेंज उघडकीस आणल्यानंतर "एटीएस'चे पथक औरंगाबादला गेले होते; पण हैदराबादहून फैज महंमदसह दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक करून आणल्यानंतर हे पथक पुन्हा लातुरात दाखल झाले. या दोघांची "एटीएस'च्या पथकाने कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संपर्क आला होता का? याचा तपास हे पथक करीत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांची तीन ते चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Web Title: latur news crime Fake telephone exchange case