जड अंतःकरणाने शेतकऱ्याने सहा एकर पिकांवर फिरविला रोटावेटर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औसा - गेल्या दीड महिन्यापासून पावसाने बगल दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सुकत चाललेल्या पिकांवर नांगर फिरवायला सुरुवात केली असून नागरसोगा (ता. औसा) येथील दयानंद बेडगे या शेतकऱ्याने रविवारी (ता. ६) आपल्या कोरडवाहू शेतीतील सहा एकरावर पेरलेल्या सोयाबीन व तुरीच्या पिकावर रोटावेटर (रोटर) फिरवला आहे. यावरुन शेतकऱ्यांच्या भयावह परिस्थितीची जाणीव होत आहे. 

औसा - गेल्या दीड महिन्यापासून पावसाने बगल दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सुकत चाललेल्या पिकांवर नांगर फिरवायला सुरुवात केली असून नागरसोगा (ता. औसा) येथील दयानंद बेडगे या शेतकऱ्याने रविवारी (ता. ६) आपल्या कोरडवाहू शेतीतील सहा एकरावर पेरलेल्या सोयाबीन व तुरीच्या पिकावर रोटावेटर (रोटर) फिरवला आहे. यावरुन शेतकऱ्यांच्या भयावह परिस्थितीची जाणीव होत आहे. 

गेली चार वर्षे दुष्काळाशी झुंज देत आपली उपजीविका भागवणाऱ्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नापिकीने, कधी अवकाळीने, कधी गारपिटीने तर कधी अतिवृष्टीने मारले आहे. डोक्‍यावर असलेले कर्ज आणि पुढ्यात असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धीर धरुन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या ना त्या कारणांनी कंबरडे मोडण्याचेच काम केले आहे. 

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आणि मागील आठ ते दहा वर्षात पहिल्यांदाच मृगात पेरण्या झाल्या. चांगला पाऊस, सरासरीच्या शंभर टक्के पाऊस बरसणार अशा हवामान खात्याच्या वावड्या उडाल्या आणि शेतकऱ्यांना हिरवे सपान पडू लागले. मोसमात पेरणी झाल्यामुळे आणि पिकापुरता पाऊस पडल्याने पिके जोमात आली. 

खुरपणी, दुंडणी करुन पिके तणमुक्त करुन शेतकरी खुशीत होता. परंतु दीड महिन्यापासून पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे सपान आता काळे पडू लागले आहे. माळरानावर पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्यांच्याकडे पाणी आहे तेही भांबावले आहेत. खरिपाची पिके पाण्याअभावी वाळत असताना हे बघवत नाही म्हणून यावर नांगर फिरविण्याचाच मार्ग असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकप्रतिनिधींनाही कळवळा नाही
सध्या विधानसभेचे आणि लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. वेगवेगळ्या विषयावरून संसदेत रणकंदन माजले आहे. परंतु दीड महिन्यापासून पावसाने गुंगारा दिल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने कुणीही बोलताना दिसत नाही. त्यामुळे आता शेतकरी अस्मानीसोबतच सुलतानी मार सहन करीत आहेत.

पाऊस पडला तरी पिके जाणार
आता पाऊस पडला तरी मूग, उडीद यासारखी पिके हाताला लागणार नाहीत. पिकांनी माना टाकल्या असून फुलोरा आणि बारीक शेंगा गळून जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: latur news farmer crop