औसा तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळणार नवे कारभारी; प्रस्थापितांना मतदारांनी दिला झोला

जलील पठाण
Tuesday, 19 January 2021

तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये उजनी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे योगीराज पाटील यांच्या गटाने १५ पैकी ८ जागा जिंकल्या

औसा (लातूर): सोमवारी (ता.१८) तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी येथील प्रशासकीय इमारतीचा सभागृहात पार पडली. यामध्ये मतदारांनी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना जोरदार झोला दिला आहे. गावचा कारभार नवीन कारभाऱ्याकडे देऊन परिवर्तनाची एक झलक या निमित्ताने तालुका पाहत आहे. तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये उजनी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे योगीराज पाटील यांच्या गटाने १५ पैकी ८ जागा जिंकल्या.

लामजना येथे बालाजी पाटील यांच्या पॅनेलने १७ पैकी १३ जागावर आपले वर्चस्व राखले. नागरसोग्यात सेवानिवृत्त शिक्षक भास्कर सूर्यवंशी यांनी ११ पैकी ८ जागा जिंकल्या. या निवडणुकीत पती - पत्नी दोघानींही विजय मिळवला असल्याने आता गावाच्या राजकारणात पती पत्नीचा वाटा असणार आहे. तळणी हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार यांचे गाव मात्र येथे सत्यवान जाधव पाटील व मोहन सावळसुरे यांच्या पॅनेलने ११ पैकी १० जागा जिंकून आपला दबदबा निर्माण केला.

उदगीरमध्ये युवक उमेदवारांना मतदारांची पसंती; ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का | eSakal

भादा येथील माजी सरपंच बालाजी शिंदे यांनी १३ पैकी १२ जागा राखत भाद्याचा किंगमेकर मीच असल्याचे सांगितले. सेलू येथे माजी समाज कल्याण सभापती बालाजी कांबळे समर्थकांनी ११ पैकी १० जागेवर बाजी मारली. हासेगाव येथे बालाजी बावगे यांच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. खरोसा ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी ११ जागा जिंकून अजय साळुंखे यांच्या पॅनेलने विजय संपादन केला आहे. भेटा येथे ११ जागेपैकी बालाजी हजारे यांच्या पॅनलला ०५ जागा मिळाल्या तर विरोधी दोन्ही पॅनेलला प्रत्येकी 03 जागा मिळाल्याने कुठल्याच गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

तपसे चिंचोली येथे 11 पैकी राजेश्वर पाटील यांनी ११ पैकी ०६ जागा राखत बाजी मारली. तर सचिन कवठाळे यांना ५ जागा मिळाल्या आहेत. बेलकुंड ग्रामपंचायती मध्ये विष्णू कोळी यांनी ६ जागा जिंकून ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला आहे. लखनगाव येथे ज्ञानोबा गोडभरले समर्थकांना ६ जागा मिळाल्या. हरेगाव ग्रामपंचायती मध्ये संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वच्या सर्व ११ जागा पटकावल्या आहेत.

हातात कत्ती, चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न; लातुरात दोघांना अटक

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली असून प्रस्थापितांना घरी बसविले आहे. येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहांमध्ये सकाळी दहा वाजता चोख बंदोबस्तामध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या एकूण 9 फेऱ्या झाल्या. उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी शोभा पुजारी व नायब तहसीलदार शिवाजी कदम, नायब तहसीलदार वृषाली केसकर, नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, सुभाष कानडे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. मतमोजणीसाठी औसा शहरात अभूतपूर्व गर्दी झाली होती.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur news Gram Panchayat result Ausa taluka Voters give chance to youngsters