
जुना औसा रोड परिसरात रविवारी (ता.१७) सायंकाळी अमोल गंभीरे, प्रतिक माने व इतर चार जण हातात कत्ती घेवून मोठ मोठ्याने आरडा ओरड करीत दुकान बंद करा असे म्हणत फिरत होते.
लातूर : येथील नंदी स्टॉप व जुना औसा रोड परिसरात दोन वेगवेगळ्या घटनात हातात कत्ती, चाकू घेवून व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यात दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येथील जुना औसा रोड परिसरात रविवारी (ता.१७) सायंकाळी अमोल गंभीरे, प्रतिक माने व इतर चार जण हातात कत्ती घेवून मोठ मोठ्याने आरडा ओरड करीत दुकान बंद करा असे म्हणत फिरत होते. येथील अशोक कदम व इतर व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून त्यांनी पैशचा मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हातातील कत्तीने धमकावत वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान एक तासाच्या फरकाने नंदी स्टॉप परिसरात अशीच एक घटना घडली. या परिसरात असलेल्या अनुसया गिफ्ट सेंटरसमोर सचिन रमाकांत देशपांडे (वय २३) हा तरुण थाबंला होता. तेथे योगेश नरवडे, दिनेश नरवडे, सत्या अंबेकर आदींनी संगणमत करून तू आमच्याकडे का पाहतोस म्हणून शिविगाळ केली. त्यानंतर योगेश नरवडे याने हातातील चाकू देशपांडे यांच्या गळ्याला लावून धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. इतर तिघांनी हातातील लोखंडी रॉड व लाकडी काठीने देशपांडे याच्या वडिल व भावास अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या घटनानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. यात योगेश नरवडे व सत्या अंबेकर याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्य़ासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्य़ात आली आहेत.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
या दोनही घटना वेगवेगळ्या आहेत. सदरचे भांडण हे गटागटात झालेले नाही. या दोन्ही घटनामुळे कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण झालेली नाही. या दोघाना अटक करण्य़ात आली आहे. इतरांचा शोध सुरु आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसाना माहिती द्यावी.
निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक.
संपादन - गणेश पिटेकर