'खेती पे चर्चा' करून जमिनी बळकावू नका - खा. शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

लातूर - लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी विदर्भात "चाय पे चर्चा' केली होती. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, असे धोरण राबवण्याचे आश्वासन दिले होते.

लातूर - लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी विदर्भात "चाय पे चर्चा' केली होती. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, असे धोरण राबवण्याचे आश्वासन दिले होते.

जेथे त्यांनी ही चर्चा केली, तेथेच सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हातून "कप' गेला. आता ते "खेती पे चर्चा' करणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या हातून जमिनी बळकावू नये, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.

मराठवाड्यात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कसपट काढण्यासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये खर्च लागणार आहे. शासन मात्र दोन हजार चारशे रुपये मदत देणार आहे. कर्जमाफीचे 23 हजार कोटी रुपये बॅंकेत जमा केल्याचे शासन सांगते. ते कोणाच्या खात्यावर गेले हे मात्र सांगत नाही. भूलथापा देऊन हे शासन सत्तेवर आले आहे, असे सांगून शेट्टी यांनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्र्यांना झोडपून काढण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शेट्टी म्हणाले, "साखरेचे भाव पाडण्याचा प्रकार संशयास्पद आहे. व्यापाऱ्याच्या स्टॉकवरील नियंत्रण उठवल्यानंतर हे भाव पडले आहेत. त्यामुळे शासनाने गोदाम तपासून दोन महिन्यांत झालेली साखरेची खरेदी -विक्रीची चौकशी करावी. कारखान्यांनी ठरलेली उचल दिलीच पाहिजे, यासाठी 17 फेब्रुवारीला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. बीडमध्ये आमचे पोस्टर काढले व मुख्यमंत्र्यांचे ठेवले गेले. भाजपला एवढी मस्ती आली असेल तर त्यांनी मैदानात उतरावे, मी तयार आहे.'

सदाभाऊंनी घातलाय हिरवा गॉगल
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत संघटना सोडून गेल्याने संघटनेला काहीच फरक पडला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवाणारे खोत यांना सत्ता मिळताच त्यांची दृष्टी बदलली आहे. त्यांनी हिरवा गॉगल घातला आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी सर्व शिवार हिरवे दिसू लागले आहे. सर्वत्र आनंदी आनंद दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

Web Title: latur news marathwada news kheti pe charcha raju shetty