आम्ही महापालिकेत आहोत का नाही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

लातूर - लातूर शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहराचा चारही दिशांनी विकास होत आहे. शहरात घर घेणे परवडत नाही म्हणून शहराच्या बाजूला नवीन वस्त्या तयार होत आहेत. काही वस्त्या तर दहा ते पंधरा वर्षांपासून वसलेल्या आहेत; पण या नवीन वस्त्यांत महापालिका पोचली की नाही अशी अवस्था आहे. शहरातील काही भाग चकचकीत, तर या नवीन वस्त्या मात्र भकास आहेत. रस्ते, नाल्या, पाणी हे मूलभूत प्रश्नच या नवीन वस्त्यांना भेडसावताना दिसत आहेत. 

शहराची लोकसंख्या आता पाच लाखांवर गेली आहे. शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहराच्या महत्त्वाचे असलेल्या औसा रस्ता, नांदेड रस्ता, अंबाजोगाई रस्ता व बार्शी रस्ता या चारही दिशांना शहर वाढत चालले आहे. शहरात घर घेणे सामान्य व गरिबांच्या आवाक्‍याबाहेरचे आहे. त्यामुळे असे लोक शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर शहरालगत एखादा प्लॉट घेऊन घरे बांधत आहेत. हळूहळू त्याचे वस्ती व एखाद्या नगरात रूपांतर होते. शहरातील नांदेड रस्ता; तसेच बार्शी रस्त्यावर तर दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत; पण तत्कालीन पालिका व सध्याची महापालिका त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नसल्याचे चित्र या नवीन वस्त्यांत आहे. 

शहरातील बहुतांश रस्ते हे सिमेंटचे करण्यात आले आहेत. गाव भागही यातून सुटलेला नाही; पण नवीन वस्त्यांत मात्र कच्चे रस्ते आहेत. पावसाळ्यात तर नागरिकांना तारेवरची कसरत करूनच या रस्त्यावरून चालावे लागते. नाल्यांचा प्रश्न असल्याने अनेक ठिकाणी घाण पाणी रस्त्यावरच आलेले असते. पाण्याची समस्याही मोठी आहे. पाइपलाइनच नसल्याने पाण्याची मोठी समस्या नवीन वस्त्यांत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहरात गेल्या काही वर्षांत अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत. त्यांच्या समस्याही आहेत. अमृत योजनेतून या नवीन वस्त्यांत पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्र्यांनी शहरासाठी ४४ कोटी मंजूर केले आहेत. त्यातूनही नवीन कामे केली जाणार आहेत. रस्त्यांची कामेही केली जाणार आहेत.
सुरेश पवार, महापौर, महापालिका.

शहरातील गाझीपुरा, साईबाबानगर, बरकतनगर, बुऱ्हाणनगर, गरूड चौकाच्या पुढील परिसर अशा अनेक भागांतील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पाण्याचा प्रश्न आहे. गटारी नाहीत. कचऱ्याचा प्रश्न आहे. कच्चे रस्ते असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- इम्रान सय्यद, नूतन नगरसेवक.

Web Title: latur news municipal corporation