निलंग्यात ४० टक्के नागरिक पाण्यापासून वंचित

राम काळगे 
रविवार, 2 जुलै 2017

निलंगा - निलंगा शहरासाठी माकणी (ता. लोहारा) येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मुबलक पाणी असतानाही काही भागात नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. गेल्या काही वर्षांत शहर विस्तारले असून तब्बल ४० टक्के जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. 

निलंगा - निलंगा शहरासाठी माकणी (ता. लोहारा) येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मुबलक पाणी असतानाही काही भागात नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. गेल्या काही वर्षांत शहर विस्तारले असून तब्बल ४० टक्के जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टीमुळे जवळपास ४८ किलोमीटर अंतरावरून माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून निलंगा शहरासाठी पाइपलाइन योजना करण्यात आली. येथील नगरपालिका ‘क’ वर्ग असल्याने प्रारंभी ही योजना पालिकेला परवडणार की नाही याबाबत संभ्रम होता. शहरातील विविध भागांत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असूनही निलंगा शहराला काँग्रेसच्या कार्यकाळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. निवडणूक काळात याचा फटका बसला व सत्तापरिवर्तन होऊन सत्ता भाजपच्या हातात आली. नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या प्रयत्नांनी मुबलक पाणी मिळत असले, तरी निलंगा शहरातील माळी गल्ली, खारवण गल्ली, कुंभार गल्ली, खाटिक गल्लीतील काही भागात, शिवाजीनगर, दर्गा भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नाही. शहराचे विस्तारीरण झपाट्याने होत असून, निलंगा शहराला पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून १०५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रकमेतून माकणी ते निलंगा शहरापर्यंत रस्त्याच्या बाजूने लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार आहे. उदगीर मोड भागात नवीन जलकुंभ व नवीन विस्तारीत भागात पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात पाइपलाइनचा आकार लहान-मोठा असल्याने पाण्याचा दाबही कमी जास्त असतो. त्यामुळे जुनी पाइपलाइनही पूर्णतः बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पाणीपुरवठा योजनेचा विस्तार व नियोजन गरजेचे असून शहरातील जवळपास ४० टक्के नागरिकांना आजही नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. पालिकेत सत्तापरिवर्तन होऊन काही महिने लोटले आहेत. आता पाण्याच्या नियोजनासाठी व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. शिवाय शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी घेण्यात आली असून त्याचा परिणाम अधिकृत नळधारकांवर होताना दिसत आहे. 

शहराचा विस्तार झपाट्याने होत असून अनेक ठिकाणी नागिरक अधिकृत ले-आऊट प्लॅन न देता राहत आहेत. ज्या ठिकाणी नवे प्लॉट पाडण्यात आले आहेत त्यांची रीतसर नोंदणी आवश्‍यक असून त्यानंतर मूलभूत सुविधा पुरविणे सोयीचे होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांनी शहरासाठी १०५ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रकल्पापासून निलंगा शहरापर्यंत सर्व पाइपलाइन लोखंडी करण्यात येणार आहे. पाइपलाइनचेही विस्तारीकरण होणार आहे. अनेक भागांना कित्येक वर्षांपासून पाणी मिळत नाही, त्या भागांमध्ये एकाच आकाराची पाइपलाइन टाकणे गरजेचे आहे. 
- हरिभाऊ कांबळे, पाणीपुरवठा सभापती.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, नगरपालिकेतील ढिसाळ नियोजनामुळे आजही शहरातील ४० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नाही. काही भागात पाणी कमी दाबाने येते. नव्याने झालेल्या वस्त्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष असून येथे नवीन पाइपलाइन टाकणे गरजेचे आहे. शिवाय अनधिकृत जोडण्या मोठ्या प्रमाणात आहेत. याबाबत कारवाई होणे गरजेचे आहे.
- गोविंद शिंगाडे, माजी बांधकाम सभापती.

Web Title: latur news nilanga news water

टॅग्स