सरपंच निवडीपूर्वीच अपात्रतेच्या खेळाला सुरवात, राजकीय रस्सीखेच सुरू

विकास गाढवे
Wednesday, 3 February 2021

अनेक ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढती होऊन पॅनेलला काठावर बहुमत मिळाले आहे. एक किंवा दोन सदस्य कमी निवडून आल्यामुळे सत्तेबाहेर राहाण्याची वेळ प्रस्थापितांवर आली आहे.

लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर गुरुवारपासून (ता. चार) जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामुळे काही गावात सरपंच होण्यासाठी तर काही गावात उपसरपंचांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून शहकाटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे. यातूनच दोन ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका सदस्याला अपात्र करण्याची मागणी विरोधी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या सदस्यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याचा कारणांवरून अपात्र करण्याची मागणी झाली आहे.

जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. तेथूनच गावागावांत सरपंच व उपसरपंचांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढती होऊन पॅनेलला काठावर बहुमत मिळाले आहे. एक किंवा दोन सदस्य कमी निवडून आल्यामुळे सत्तेबाहेर राहाण्याची वेळ प्रस्थापितांवर आली आहे. यातूनच विरोधी पॅनेलच्या सदस्यांच्या फोडाफोडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही गावात हे प्रयत्न सुरू होण्यापू्र्वीच नूतन सदस्य अज्ञात ठिकाणी सहलीवर गेले आहेत.

त्यांचा शोध लागत नसल्याने फोडाफोडीचे प्रयत्न थांबले असून त्याऐवजी काही सदस्यांना अपात्र करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. यातूनच दोनपेक्षा अधिक अपत्य, सरकारी जागेवरील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी, स्वच्छतागृह नसणे आदी कारणांचा शोध घेण्यात येत असून कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. सध्या तरी दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यावरून दोन सदस्यांना अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली आहे. यात माळेगाव कल्याणी (ता. निलंगा) व धानोरा (बु. ता. अहमदपूर) येथील प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश आहे.

दोन्हीपैकी एक अनुसूचित जातीची महिला असून दुसरा अनुसूचित जातीचा आहे. अपात्र करण्याची मागणी झालेला माळेगाव कल्याणीचा सदस्य हा सरपंचपदाचा दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला अपात्र केल्यानंतर विरोधी गटातील याच प्रवर्गातील सदस्याला सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. अकरा सदस्य असलेल्या धानोराचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असून ही महिला बिनविरोध निवडून आली आहे. ती दोन्हीपैकी एकाही पॅनेलची नाही. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी पाच सदस्य विजयी झाल्याने गावात उपसरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur News Political Drama Begins Before Sarpanch Elections Marathi News