लातूरच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा सौदा रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

लातूर - खरिपातील मूग व उडदानंतर सोयाबीनची आवक सुरू होताच बाजारपेठेत हमीभावाचा तिढा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनेची मागणी व सरकारच्या सूचनेनंतर शुक्रवारी (ता. 27) जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी न करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले. त्याचा परिणाम शनिवारी (ता. 27) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात सोयाबीनचा सौदा निघाला नाही. सोयाबीननंतर सोमवारपासून (ता. 30) मूग व उडदाचा सौदाही बंद पडण्याची शक्‍यता आहे. 

लातूर - खरिपातील मूग व उडदानंतर सोयाबीनची आवक सुरू होताच बाजारपेठेत हमीभावाचा तिढा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनेची मागणी व सरकारच्या सूचनेनंतर शुक्रवारी (ता. 27) जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी न करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले. त्याचा परिणाम शनिवारी (ता. 27) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात सोयाबीनचा सौदा निघाला नाही. सोयाबीननंतर सोमवारपासून (ता. 30) मूग व उडदाचा सौदाही बंद पडण्याची शक्‍यता आहे. 

येथील बाजारपेठेत दरवर्षी खरिपातील पिकांच्या काढणीनंतर हमीभावाचा तिढा निर्माण होत आहे. यंदाही खरिपातील पिके बाजारात विक्रीसाठी येण्यापूर्वीच शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली. शेतीमालाची विक्री झाल्यानंतर सरकारकडून आधारभूत खरेदी केंद्र सुरू केली जातात. शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केलेल्या शेतीमालाची या खरेदी केंद्रावर व्यापारी विक्री करतात. यातूनच मागील हंगामातील तुरीच्या खरेदीची प्रक्रिया अनेक महिने सुरू होती. यामुळेच यंदा खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची भूमिका शेतकरी संघटना व विरोधी राजकीय पक्षांनी रेटली. यामुळे जिल्ह्यात उदगीर व लातूर येथे सोयाबीन, मूग व उडदासाठी बारा ऑक्‍टोबरपासून खरेदी केंद्र सुरू झाली. मात्र, केंद्रावर सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. आर्द्रता (मॉईश्‍चर) व डागीचे (डॅमेज) प्रमाण लक्षात घेता खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीला नकार दिला जात आहे. सध्या सोयाबीनमधील आर्द्रतेची टक्केवारी 18 पर्यंत असून परतीच्या पावसाने सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी झाले आहे. केंद्रावर बारा टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता व तीन टक्‍क्‍यापर्यंत डागी सोयाबीनची खरेदी केली जात आहे. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडत बाजारात येत असून व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करत आहेत. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार 50 रुपये असताना बाजारात दोन हजार तीनशे तर दोन हजार आठशे रुपये क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. याला तीव्र विरोध करत शेतकरी संघटना व शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन व शेतीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. 

इकडे आड अन्‌ तिकडे विहीर 
त्यावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व बाजार समिती व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी घेतली. बैठकीत बाजार समित्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन, मूग व उडिदाची खरेदी करू नये, असे आदेश सहायक निबंधक (प्रशासन) डॉ. गजेंद्र देशमुख यांना दिले. त्याची अंमलबजावणी बाजार समित्यांनी शनिवारपासून सुरू केल्यामुळे येथील बाजारात सोयाबीनचा सौदा निघाला नाही. आर्द्रता व डागीच्या अधिक प्रमाणामुळे खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री होत नाही तर हमीभावामुळे बाजारातील सौदाही बंद पडला. यामुळे सोयाबीन विकून तातडीच्या आर्थिक गरजा भागवताना शेतकऱ्यांची स्थिती "इकडे आड तिकडे विहीर' होऊन बसली. दरम्यान, शनिवारी बाजारात दहा हजारहून अधिक क्विंटलची आवक झाल्याचे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले. 

आणखी नवीन तीन खरेदी केंद्र 
सोयाबीनमधील आर्द्रता व डागीचे प्रमाण लक्षात घेता सध्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची तेवढी आवक नाही किंवा शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी नोंदणीही नाही. या स्थितीत जिल्ह्यात येत्या दोन दिवसात नवीन तीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी दिली. निलंगा, औसा व अहमदपूर येथील ही केंद्र सुरू होणार असून आता दोन तालुक्‍यांसाठी एक याप्रमाणे केंद्र असणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोयाबीननंतर आता मूग व उडदाचाही सौदा बंद पडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

Web Title: latur news soyabean