औसा तहसीलला संवेदना आहेत की नाही?

औसा तहसीलला संवेदना आहेत की नाही?

औसा -  शासनाच्या विविध योजनांचे अनुदान वाटप करताना तहसील विभागाने वेळोवेळी दिरंगाई करीत आपली कर्तव्यशून्यता दाखवून दिली असताना मागील काही दिवसांपासून तालुक्‍यातील शेकडो दिव्यांग, निराधार व श्रावणबाळ योजनांचा लाभ घेऊ  इच्छिणारांचीही हेळसांड होत असल्याचा प्रकार घडत आहे. विदारक चित्र म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून संगायो, इंगायो  विभागाची एकही बैठक न झाल्याने दररोज कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन अनेक दिव्यांग लाभार्थी असहाय वेदणा सहन करीत तहसीलच्या पायऱ्या झिजवत आहेत. समोर दिसणारे चित्र पाहता आता तहसीलच्या संवेदना संपल्या आहेत की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकाला पडल्यावाचून राहत नाही. 

या वर्षभरात शासनाकडून बागायती अनुदानासह पडझडीचे अनुदान मोठ्या प्रमाणात तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी तहसलीकडे वर्ग केले; मात्र सदर अनुदान वाटप करताना त्या त्या वेळी दिरंगाईच समोर आली. या बाबत प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल बातम्याही प्रकाशित झाल्या, याकडे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आणि परिणामी पुन्हा पडझडीचे अनुदान वापट करताना तहसीलचा भोंगळ कारभार जगासमोर आला. गेल्या वर्षी झालेल्या पडझडीचे पैसे सप्टेंबर तोंडावर आल्यावर काल परवापर्यंत लाभार्थ्यांना मिळणे यावरूनच तहसीलची ‘कर्तव्य तत्परता’ दिसून येते. अशा घटनांमुळे अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. शासनाकडून पडझडीचे अनुदान वाटपात दिरंगाई का झाली या बाबत कुठलीच विचारणा येथील तहसील विभागाला वरिष्ठांकडून झाली नाही. त्यांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम झाल्याने असा प्रकार फोफावला असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. चार महिन्यांपासून संगायो व इंगायोची कुठलीच बैठक न झाल्याने आनेक दिव्यांग येथील तहसील कार्यालयाच्या पायऱ्याखाली बसून हातात कागदाचे गाठोडे घेऊन प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्‍यातील भुसणी येथील वीरभद्र साखरे व कुशाबाई साखरे या दिव्यांग दांमत्याला परवाच तहसील कार्यालयाच्या पायऱ्याजवळ सकाळपासून तलाठ्याची वाट पाहत तिष्ठत बसावे लागले. पायाने अपंग व खरडत चालणाऱ्या वीरभद्र साखरेंनी दिवसातून अनेकदा साहेबांच्या सहीसाठी खालून वरपर्यंत चारदा कशाबशा चकरा मारल्या; परंतु संध्याकाळपर्यंत या लाभार्थाला सही न मिळाल्याने आपला अर्ज दाखल करता आला नाही. या दिव्यांगाची एवढी कसरत सुरू असताना या विभागाच्या एकाही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्याची दया आली नाही. त्यामुळे या कार्यालायाला मानवी संवेदनाच आहेत का नाही, असा सवाल निर्माण होत आहे.

वरिष्ठही तहसीलला पाठीशी घालत असल्याचा आरोप
औसा तहसील कार्यालयात एवढा सावळा गोंधळ सुरू असताना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आता गोरगरीब, निराधार, श्रावण बाळ आणि दिव्यांगाना सुलतानी मार देण्याचा प्रकार येथील तहसीलकडून सातत्याने बसत असताना याबाबत या कार्यालयाचे प्रमुख असणारे उपविभागीय अधिकारी यांनी नेहमीच याकडे डोळेझाक केली आहे. तक्रारी असतानाही जिल्हाधिकारीही आता येथील तहसील कार्यालयाला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श तरी घ्या!
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या वाहनाला खासगी समजून हात दाखविलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला आस्थेने आपल्यासोबत  कारमध्ये बसविले होते. महिलेची विचारपूस करून तिला धीर दिला आणि एकाच दिवसात पात्र असलेल्या शासकीय योजनेचा लाभही महिलेला मिळवून दिला होता. ही घटना ताजी असताना यापासून प्रेरणा घेणे तर सोडाच उलट कर्तव्याला मूठमाती देण्याचा प्रकार औसा तहसीलकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com