कोरोनामुक्तीच्या संकल्पाने लातूरात नववर्षाचे स्वागत, घरोघरी उभारली गुढी

हरी तुगावकर
Wednesday, 25 March 2020

आज बुधवारी (ता.२५) गुढीपाडवा. मराठी नववर्षाची सुरवात. उत्साहाचा सण. पण कोरोनाचे संकट प्रत्येकाच्या डोक्यावर घोंघावत आहे. त्यामुळे आज घरोघरी लातूर शहरात कोरोना मुक्तीचा संकल्प करीत गुढी उभारण्यात आली.

लातूर ः आज बुधवारी (ता.२५) गुढीपाडवा. मराठी नववर्षाची सुरवात. उत्साहाचा सण. पण कोरोनाचे संकट प्रत्येकाच्या डोक्यावर घोंघावत आहे. त्यामुळे आज घरोघरी कोरोना मुक्तीचा संकल्प करीत गुढी उभारण्यात आली. हा संकल्प नववर्षाचे स्वागत करण्या आले. करीत आजच्या उत्साहाला भितीची झालर मात्र कायम राहिली.

भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्व आहे. व्यापारी, शेतकरी, आडते, बांधकाम अशा प्रत्येक क्षेत्रांत या दिवसाला महत्व दिले जाते. नवनवीन प्रकल्प हाती घेतले जातात. मोठ्या थाटात भूमिपूजन केले जाते. अनेक व्यापारी आजपासून नवीन खातेपानही सुरु करतात. पण आज साजरा होत असलेल्या गुढीपाडवा जरा वेगळाच राहिला. शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. सर्वच कुटुंबच घरी असल्याने वेगळा आनंद होताच. पण गुढीची पूजा करताना प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भिती होती. प्रत्येकाच्या उत्साहाला भितीचे सावट होते.

वाचा ः बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना भाजप करणार अन्नपुरवठा

कोरोना मुक्तीचा संकल्प करीत प्रत्येकाने गुढी उभारत नवनवर्षाचे स्वागत केले. कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, या वर्षीचा गुढीपाडवा घरात राहून साजरा करुया. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेवूया, अशा पद्धतीनेच घरोघरी गुढीची मनोभावे पुजा करण्यात आली. संचारबंदी लागू असल्याने घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. आरोग्यमय गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या शुभेच्छा या संदेशातून देण्यात आल्या.

या नववर्षात हे करुया
-कोरोना मुक्तीचा संकल्प करू या..
-संयम बाळगू या..कोरोनाला हरवू या...
-आज मला रुग्णालयाच्या रुपात मंदिर तर डॉक्टर, पोलिसांच्या रुपात देव दिसतोय..
-प्रशासनाच्या सूचनांचे पालन करू, नियमांच आदर करू अन आरोग्याची गुढी उभारू
-जगावरील संकट टळो..सर्वांना निरोगी आरोग्य लाभो...
-ऐक्याची गुढी उभारू, आलेल्या संकटावर एकजुटीने मात करू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Residents Celebrate Gudhipadawa Latur