लातूर ः औशात शिवसेना विभागली दोन गटात

जलील पठाण
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

माजी आमदार निलंगेकर गटात तर जिल्हाप्रमुख अभिमन्यू पवारांच्या रथावर
 

औसा (जिल्हा लातूर) : औसा मतदारसंघात उमेदवारीवरून पेटलेली युतीमधली धगधग काही कमी होण्याचे नाव घेत नसून यामध्ये शिवसेना दोन गटात विभागल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (ता. चार) या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युतीचा उमेदवार भूमीपुत्रच असला पाहिजे याच्या समर्थनात माजी आमदार दिनकर माने हे अरविंद पाटील निलंगेकर गटात वावरतांना दिसून आले, तर दुसरीकडे युतीचा धर्म पाळला पाहिजे असा पवित्रा घेत सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी हे अभिमन्यू पवारांच्या रथावर दिसून आले. 

औसा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांना उमेदवारी मिळाल्याने येथील सेनेसह स्थानिक भाजपाच्या एका गटात कमालीची नाराजी पसरली होती. याच कारणावरून बुधवारी (ता. दोन) नाराज सेना- भाजपा गटाने तीन तास महामार्ग रोखून आपला रोष व्यक्त केला होता. याला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली मागणी लावून धरण्याचा शब्द दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

काहीतरी होईल या आशेवर असणार्य़ा या आंदोलकांची शेवटी निराशाच झाल्याने भाजपच्या नाराज गटातून किरण उटगे यांनी तर शिवसेनेच्या दिनकर माने यांनी पालकमंत्र्यांचे लहान बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासोबत आपली उमेदवारी दाखल केली.

हे होत असताना सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी युतीचा धर्म म्हणत पवारांच्या रथावर हजेरी लावत आम्ही पवारांचे समर्थक अशी भूमिका घेतली सोमवंशींसोबत सेनेच्या जयश्री उटगे, अॅड. रोहित गोमदे आदीही पवारांच्या रथावर दिसून आल्याने सेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur: Shiv Sena divided into two groups