
लातूर : ‘देशीकेंद्र’समोरील सबवे पाडणार
लातूर : येथील मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या विलासराव देशमुख मार्गावरील देशीकेंद्र विद्यालयाच्या समोरील सबवे पाडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. यात सदरील निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. सी. भोये, कार्यकारी अभियंता बी. एम. थोरात, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, औसा-लातूर, चाकूर-लोहा, लातूर-कळंब या रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार उपस्थित होते. लोकनेते विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने येथे रेल्वे सुरु झाली. त्यामुळे जुनी ब्रॉडगेजची लाईन रस्त्याचा शहराच्या मुख्य रस्त्याला पर्याय म्हणून उपयोगात आणण्याचा निर्णय झाला. यातून राजस्थान शाळा ते एमआयडीसीपर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; पाहा व्हिडिओ
या रस्त्यावर देशिकेंद्र विद्यालयाच्यासमोर सबवे करण्यात आला होता. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. या रस्त्याच्या विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही उपाय योजनाही सुचविल्या होत्या. यातूनच आता हा सबवे पाडला जात आहे. या बैठकीत वाहतुकीच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघाताचे व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपघात कोणत्या ठिकाणी झाला व कशामुळे झाला, याची तपासणी करून अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले. यावेळी रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात टाळण्यासाठी तयार केलेला व्हॉटसॲप क्रमांकास (९६९९४०३७७६) प्रसिध्दी देणे, बसेस वर स्टिकर्स लावण्याबाबत निर्देश देण्यात आले.
हेही वाचा: नगर-आष्टी मार्गावर भीषण अपघात, एक ठार अन् चार गंभीर जखमी
‘कारखान्यांच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवा’
जिल्ह्यातील साखर कारखान्यांना त्यांच्याकडे वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याबाबत निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील अपघाताची संख्या पाहून पोलिस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जिल्ह्यात जास्त अपघात झालेल्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट व्याख्या अंतर्गत येणाऱ्या ठिकाणाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजीव गांधी चौक ते छत्रपती चौक वाडा हॉटेल जवळ स्ट्रीट लाइट व हाय मास्ट लवकरात- लवकर बसविण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारास देण्यात आल्या.
अकरा कोटींचा खर्च; २० कोटींचा आराखडा
राजस्थान विद्यालयापासून सुरु होत असलेल्या या मार्गावर आतापर्यंत ११ कोटींचा खर्च झालेला आहे. आता नव्याने या रस्त्याचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यात पहिल्या टप्प्यात राजस्थान शाळा ते शिवाजी चौक या एक किलोमीटर अंतरावर रस्त्याचा विकास केला जाणार आहे. यात वीस कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. यात सबवे पाडणे, टू वे लाईन, ड्रेनेज लाईन, पार्किंग, फुड प्लाझा, पाथवे, विद्युतीकरण आदींचा समावेश आहे.
Web Title: Latur Subway Front Deshikendra Demolished
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..