नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीत लातूरची आघाडी, ४४ कर्मचाऱ्यांत जिल्ह्यातील १९ जण

विकास गाढवे
Tuesday, 5 January 2021

मागील नऊ महिन्यांपासून रखडलेल्या औरंगाबाद महसूल विभागातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीला राज्य सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी हिरवा कंदील दाखवला.

लातूर : मागील नऊ महिन्यांपासून रखडलेल्या औरंगाबाद महसूल विभागातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीला राज्य सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी हिरवा कंदील दाखवला. यातूनच विभागातील तब्बल ४४ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली असून, पदोन्नतीत लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील आठ अव्वल कारकून व अकरा मंडळ अधिकारी अशा १९ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.

 

 

औरंगाबाद जिल्ह्यात ५८ वर्षांत केवळ २९९ खासगी रुग्णालयांचीच नोंदणी!

 

महसूल विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांना दरवर्षी कोट्यातील रिक्त पदांनुसार नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात येते. राज्यातील अन्य महसूल विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली असताना औरंगाबाद विभागातील पदोन्नतीची ही प्रक्रिया यंदा रखडली. त्याला विविध कारणे असली तरी विभागीय आयुक्तांनी फेब्रुवारीमध्येच पदोन्नतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यावर काहीच निर्णय होत नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी आंदोलनही केले होते. मात्र, काहीच निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी होती. ती दूर करीत सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी पदोन्नतीचे आदेश काढले. विभागातील ४४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्यांत अव्वल कारकून सुधीर बिराजदार, कुलदीप देशमुख, ए. एन. पाटील, एम. जी. पंढरपुरे, डी. के. मोरे, एच. सी. धारणिक व एस. टी. कुंभार तर मंडळ अधिकारी एन. ए. शेख, ए. आर. नेटके, पी. एम. मुगावे, के. एस. घोडके, आर. एन. पत्रिके, आर. डी. धुमाळ, टी. जे. यादव, एम. ए. मुजावर, डी. के. भालेराव, आर. व्ही. काजळे व एस. पी. कांबळे यांचा समावेश आहे.

 

 

विजेचा शॉक लागून शेतकरी महिलेचा मृत्यू; गेवराई खुर्द येथील घटना

 

पत्रकार ते नायब तहसीलदार
नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळालेले जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुधीर बिराजदार यांची शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयात नियुक्ती झाली आहे. श्री. बिराजदार यांनी अनेक वर्षे पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांची कनिष्ठ लिपिक म्हणून महसूल विभागात नियुक्ती झाली. पदोन्नतीनंतर त्यांचा पत्रकार ते नायब तहसीलदार असा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. तर जिल्हा निवडणूक विभागात अनेक वर्ष काम केलेले व सध्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अव्वल कारकून कुलदीप देशमुख यांची येथील लातूरच्या पुरवठा नायब तहसीलदारपदी झालेल्या नियुक्तीमुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Top For Deputy Tahsildars Promotion