Osmanabad: उमरगा शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

उमरगा शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या

उमरगा (जि. उस्मानाबाद) : महागडी वस्तु आणि तीही दररोजच्या कामासाठी येणारी असल्याने चोरट्यांनी दुचाकीतील पेट्रोलची चोरी करण्याची शक्कल लढविली आहे. थेट पेट्रोलच्या टाकी खालील नट खोलुन पेट्रोल काढून घेण्याचा प्रकार गेल्या पंधरा दिवसात वाढला आहे. रविवारी (ता.१४) रात्रीच जवळपास दहा दुचाकीतील पेट्रोल काढून घेण्यात आले.

उमरगा शहर व परिसरात चोरीच्या घटना अधुन- मधून घडताहेत. मागच्या घरफोडीच्या अनेक घटनेत मुद्देमाल मिळून आलेला नाही. बसस्थानक असो कि बँक परिसर नजर ठेवून अलगत रक्कम पळविण्याचा प्रकारही घडताहेत. शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या वीजपंप चोरीचा प्रकार वाढला होता मात्र पोलिसांनी त्याचा पर्दापाश केला आहे. दरम्यान शहरात गेल्या पंधरा दिवसापासुन भूरट्या चोरीच्या घटना घडताहेत.

हेही वाचा: रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या दहा शहरात समावेश

पेट्रोल महागल्याने ते संकलित करून अन्यत्र ठिकाणी विक्री करणाऱ्या कांही बहाद्दर चोरट्यांची शक्कल यशस्वी ठरत आहे. रविवारी रात्री बँक कॉलनीत घरासमोर उभी केलेल्या सुभाष पांचाळ यांच्या दुचाकीतील दोन लिटर पेट्रोल काढून घेण्यात आले, टाकीच्या खालच्या बाजुचे नट काढून थेट कॅन्ड अथवा बाटलीत पेट्रोल घेण्यात येते. बालाजी नगरमध्येही श्री. केशवशेट्टी यांच्या दुचाकीतील पेट्रोल काढून घेण्यात आले.

असाच प्रकार अन्य सात ते आठ ठिकाणी घडला आहे. दरम्यान पेट्रोल चोरीमुळे दुचाकी काय बेडरूममध्ये ठेवावी का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मध्यंतरी महागड्या डिझेलमुळे बनावट डिझेल विक्रीचे रॅकेट सुरू होते, ते आता बंद आहे. पेट्रोलच्या बाबतीत मात्र बनावटगिरीचे तंत्रज्ञान सध्या तरी दिसत नाही परंतू पेट्रोल चोरीच्या घटना मात्र नागरिकांमध्ये धडकी बसविणाऱ्या आहेत. कांही जण दुचाकीत अर्धा लिटरच पेट्रोल शिल्लक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पुणे : पाणी पुरवठ्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे ठरताहेत त्रासदायक

पोलिसांचे प्रबोधन !

चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी मध्यंतरी शहरातील कांही भागात तसेच ग्रामीण भागात लोकांमध्ये जाऊन चोरीच्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी कशी बाळगायची या विषयी मार्गदर्शन केले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मुद्दाही महत्वाचा असल्याचे प्रबोधन केले गेले मात्र सर्वांनाचा घरात, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य होईल का हा प्रश्नही महत्वाचा आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मुद्दा ऐरणीवर !

उमरगा शहरात लोकसहभागातून ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यासाठी किती खर्च आला, यासंदर्भातील माहिती नाही मात्र वर्षभर कॅमेरे सुस्थितीत चालले, परिणामी अनेक घटना कॅमेऱ्यात बंद होत होत्या. चोरीचे प्रकार उघडकीस येत होते. कॅमेरे गेल्या दोन वर्षापासुन बंद आहेत. पालिकेने दुरुस्तीचा खर्च करावा अशी मागणी होते, पदाधिकारी तात्पुरता होकार देतात त्यानंतर कांहीच होत नाही. आता पोलिस, व्यापारी आणि पालिका यांनी समन्वयातुन मार्ग काढून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा पूर्ववत करण्याची गरज आहे.

loading image
go to top