लातूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

लातूर - राज्य शासनाच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान 2016-17 चे राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठीचे राज्य व विभागस्तरावरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय तीस लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अहमदपूर पंचायत समितीला विभागाचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आज जिल्हा परिषदेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लातूर जिल्हा परिषद ही या पुरस्काराची तिसऱ्यांदा मानकरी ठरली आहे.

पंचायत राज संस्थांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी हे अभियान राज्य शासनाच्या वतीने राबविले जात आहे. 2016-17 या वर्षात राबविल्या गेलेल्या या अभियानाचे पुरस्कार सोमवारी (ता. 3) जाहीर करण्यात आले.

राज्यस्तरावरील जिल्हा परिषदांसाठी असलेला प्रथम पुरस्कार लातूर जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे. तीस लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप आहे. यापूर्वी लातूर जिल्हा परिषदेला 2008-09 व 2014-15 या वर्षात हा पुरस्कार मिळाला होता.
राज्यस्तरावरील वीस लाखांचा द्वितीय पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेला, तर 17 लाखाचा तृतीय पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे. राज्यस्तरावरील पंचायत समितीसाठीचा वीस लाखांचा प्रथम पुरस्कार खानापूर विटा (जि. सांगली), 17 लाखांचा द्वितीय पुरस्कार देवगड (जि. सिंधुदुर्ग), तर 15 लाखाचा तृतीय पुरस्कार अचलपूर (जि. अमरावती) या पंचायत समितीला मिळाला आहे. औरंगाबाद विभागस्तरावरील पंचायत समितीचा 11 लाखांचा प्रथम पुरस्कार अहमदपूर पंचायत समितीला जाहीर झाला आहे. आठ लाखांचा द्वितीय पुरस्कार अंबाजोगाई तर सहा लाखांचा तृतीय पुरस्कार परळी पंचायत समितीला जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. 13) मुंबई येथे एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कॉंग्रेसच्या काळातील पुरस्कार भाजपचे पदाधिकारी स्वीकारणार
लातूर जिल्हा परिषदेवर 2016-17 मध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. सर्व पदाधिकारी त्यांचे होते. त्यांच्या काळात झालेल्या कामाला हा पुरस्कार मिळाला आहे. पण नुकतीच भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत आली आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आता हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

'लातूर जिल्हा परिषदेला चांगली परंपरा आहे. आता तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळत आहे. मोठा आनंद होत आहे. यापुढील काळातही हीच परंपरा जपली जाईल. पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळत असते. हे कोणा एकट्याचे श्रेय नाही तर टीमवर्कचा हा परिणाम आहे.''
- डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title: latur zp first in state