लातूरकरांनी अनुभवला ‘हा खेळ सावल्यांचा’

Latur News
Latur News

लातूर : ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ. पावसाळा सुरू झाल्यामुळे या खगोलीय आविष्काराचा आनंद अनुभवता येणार नाही, अशी शक्यता वाटत असतानाच पावसाने उघडीप दिली आणि निरभ्र आकाशात खंडग्रास सूर्यग्रहणाचे पूर्णवेळ दर्शन लातूरकरांना घेता आले.

ग्रहणामुळे काही वेळासाठी दिवसा अंधारल्यासारखेही झाले होते. विशेष म्हणजे, ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. पण, जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. हे खंडग्रास सूर्यग्रहण लातूरकरांनी आज (ता. २१) अनुभवले. याआधी डिसेंबर महिन्यात खंडग्रास ग्रहण झाले. पण, त्यावेळी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अवघे काही क्षणच ग्रहण पाहता आले होते. अनेकांचा हिरमोड झाला. पण, सध्या पावसाळा असून सुद्धा चक्क पावसाने उघडीप दिली. त्यामुळे हे ग्रहण पूर्ण वेळ पाहता आले.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
ग्रहणाची सुरवात सकाळी १० वाजून १० मिनिटांनी झाली. तर ग्रहण समाप्ती दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी झाली. ग्रहण उघड्या डोळ्यांनी न बघता सुरक्षित उपकरणांच्या सहाय्याने अत्यंत डोळसपणाने पहावे, असे आवाहन आजवर वेगवेगळ्या संस्थांनी, खगोल शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यामुळे काहींनी सौर चष्म्यातून तर काहींनी घरगुती उपकरणाच्या माध्यमातून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. घराघरांत ग्रहण पाहण्याची लगबग सकाळपासून दिसून येत होती.

याबाबत आपले अनुभव सांगताना लातूर विज्ञान केंद्राचे सचिव डॉ. अजय महाजन म्हणाले, ‘‘ग्रहण पाहण्यासाठी आम्ही चाळण्या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे या उपक्रमाला लहान मुलांबरोबरच गृहिणींचा आणि ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काहींनी तर आरशाचा वापर करून घरातील भींतीवर ग्रहण पाहिले. ग्रहण पाहिल्यानंतर बच्चेकंपनीचा आनंद गगणात मावत नव्हता, इतकी ती खूश झाली होती.

ग्रहण काळात केले जेवण
ग्रहण काळात जेवण करू नये, स्वयंपाक करू नये, प्रवास करू नये, ग्रहण कालावधी संपल्यानंतर अंघोळ करावी... अशा अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जातात. पण, या अंधश्रद्धा आहेत, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृतीतून दाखवून दिले. समितीचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी ग्रहण काळात प्रवास केला. शिवाय, वाटेत जेवणही केले. तर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी आपल्या कुटूंबासमवेत ग्रहणकाळात घरात जेवण केले. अंधश्रद्धांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे कुठलाही जाहीर उपक्रम आज घेता आला नाही, अशी खंतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

आपल्याकडे खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाले. पण, ज्या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होते, तेथे अभ्यासक-पर्यटकांची जाण्याची तयारी असते. कोरोनामुळे अनेकांना जाता आले नाही. अनेकांचा हिरमोड झाला. आम्हीही कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचे नियोजन पूर्वीच केले होते. पण, कोरोनामुळे ते प्रत्यक्षात उतरले नाही.
अमोल गोवंडे, सदस्य, लातूर विज्ञान केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com