तणावाला दूर ठेवण्यासाठी हास्य उपयुक्त

राजेभाऊ मोगल
सोमवार, 8 मे 2017

सध्या शहरात आठ ते दहा हास्य क्‍लब नियमित भरविले जातात. हास्य क्‍लबचे महत्त्व जाणून, त्यात सहभागी होण्याचे प्रमाणदेखील वाढत असून, यात विशेषत: ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे.

औरंगाबाद : सततची धावपळ आणि तणावामुळे होणारी चिडचीड यांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर औषध नव्हे; तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याचे अनेकजण मान्य करीत आहेत. त्यासाठी सकाळी-सकाळी मोकळ्या मैदानावर मनसोक्‍त हासण्याचे आवाज कानावर येत असल्याचे चित्र बघायला मिळते.

तंत्रज्ञानाच्या बदलात वेळ आणि काम यांची सांगड घालताना तणावासारख्या स्थितीतून जावे लागत असल्याने हास्य जणू गायबच झाले आहे. मात्र, निरोगी आयुष्य जगायचे असेल; तर हास्य अत्यंत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन सध्या शहरात आठ ते दहा हास्य क्‍लब नियमित भरविले जातात. हास्य क्‍लबचे महत्त्व जाणून, त्यात सहभागी होण्याचे प्रमाणदेखील वाढत असून, यात विशेषत: ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे.

शहानुरमियॉं दर्गा परिसरातील सिग्मा हॉस्पिटलच्या मैदानावर अमृत हास्य क्‍लबचे पंचवीस सदस्य सकाळी सात वाजताच्या सुमारास नियमित हसत आरोग्य आणि मन प्रफुल्लित करताना दिसतात. सात वर्षांपूर्वी डी. एस. काटे यांनी हा क्‍लब स्थापन केला.

हास्याचे प्रकार :
लंकेश हास्य, पिचकारी हास्य, कुत्सित हास्य, खळखळून हास्य असे 27 प्रकार आहेत.

डॉ. मदन कटारिया यांनी जगभरात हास्य क्‍लबचा प्रचार करून तणावमुक्‍तीची गुरूकिल्ली दिली. सकाळची सुरवातच आनंदी, प्रसन्न वातावरणात हासून होत असल्याने त्याचा मोठा सकारात्मक बदल दिसून येतो. यामुळे शरीराप्रमाणेच मनही निरोगी होते. याचा दुहेरी फायदा हास्य क्‍लबमधील सदस्यांना तर होतोच, शिवाय त्यांना प्रसन्न पाहून कुटुंबातील सदस्यही प्रसन्न होतात.
- डी. एस. काटे, संस्थापक, अमृत हास्य क्‍लब, औरंगाबाद.

हसल्याने जीवन निरोगी तर राहतेच; शिवाय आत्मविश्वास वाढतो. विनोदानेच मला जिवदान दिल्याने हास्यकवी झालो. माणसाने खळखळून हसले पाहिजे. एक वेळेस बॅंकेत पैसे नसले तरी चालेल; पण चेहऱ्यावर हास्य असावे; कारण हास्य हीच खरी श्रीमंती असते.
- प्रा. विष्णू सुरासे, हास्यकवी, औरंगाबाद.

हसण्याचे फायदे :

  • हसण्यामुळे रोगप्रतिकार शक्‍ती वाढते.
  • शरीरातील प्रत्येक पेशीला व्यायाम मिळतो.
  • चांगला ऑक्‍सिजन पुरवठा होतो.
  • उच्च रक्‍तदाबासारखे आजार नियंत्रणात राहतात.
  • चेहऱ्यावर प्रसन्नता जाणवते.
  • मधुमेहावर नियमित हास्याने सकारात्मक परिणाम जाणवतो.
  • शांत झोप लागते, पचनशक्‍ती वाढते.
Web Title: laughter effective to keep stress away