आष्टीतील वकिलाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

बीड - खासगी सावकारीतून एका व्यक्तीचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टी येथील एका वकिलाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. लोया यांनी हा निकाल दिला. 

बीड - खासगी सावकारीतून एका व्यक्तीचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टी येथील एका वकिलाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. लोया यांनी हा निकाल दिला. 

2007 मध्ये ऍड. प्रल्हाद माळशिखरे यांनी ऍड. भाऊसाहेब सायंबर यांच्याकडून 70 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी अनामत म्हणून ऍड. माळशिखरे यांनी एक एकर जमिनीचे खरेदीखत, कोरे धनादेश आणि कोरे बॉंड भाऊसाहेब सायंबर यांना दिले होते. या कर्जाच्या परतफेडीपोटी माळशिखरे यांनी जमीन विकून ऍड. भाऊसाहेब सायंबर यांना पैसे दिल्यानंतरही ऍड. सायंबर यांनी त्यांच्याकडील गहाण कागदपत्रे ऍड. माळशिखरे यांना परत केली नाहीत. उलट पैसे परत दे म्हणून त्यांचा सातत्याने मानसिक छळ केला. या छळाला वैतागून 21 सप्टेंबर 2014 रोजी ऍड. माळशिखरे यांनी आष्टी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात ऍड. भाऊसाहेब सायंबर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येच्या ठिकाणाहून पोलिसांनी दोन पानी चिठ्ठी जप्त केली होती. या सर्व गोष्टींचा आधार घेऊन ऍड. सायंबर याच्याविरोधात बीडचे तदर्थ सत्र न्यायाधीश आर. एस. लोया यांच्या न्यायालयात खटला चालला. बेकायदा सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने ऍड. सायंबर याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 वर्षांची, तर बेकायदा सावकारी प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा आणि एकूण 60 हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक आहेर यांनी केला. सरकार पक्षाकडून ऍड. मिलिंद वाघीरकर यांनी बाजू मांडली. सावकारीच्या नवीन कायदा प्रकरणात एखाद्या वकिलाला शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

Web Title: Lawyer to five years' rigorous imprisonment