जिल्ह्यात आघाडी फिस्कटली 62 पैकी फक्त 10 गटांत आघाडी

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - भाजप-शिवसेना युतीचा काडीमोड झाल्याने त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडी करण्यासाठी सुरू असलेल्या जोरदार प्रयत्नांवर अखेर पाणी फेरले. जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत आघाडी होण्याची दाट शक्‍यता होती.

दरम्यान, फक्त गंगापूर, वैजापूरमध्ये शंभर टक्के तर कन्नडमध्ये फक्त दोन गटांत आघाडी झाली. पैठणमध्ये ऐनवेळी आघाडी फिस्कटली असून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी सर्वच गटांत उमेदवारांना बी फॉर्म दिले आहेत. आता 62 पैकी फक्त दहाच गटांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्‍यता आहे. त्यामुळे 50 गटांमध्ये बहुरंगी लढत बघायला मिळणार.

युती तुटल्यानंतर त्याचा फायदा घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने बैठकांवर बैठका घेतल्या. किमान 30 ते 40 गटांत तरी आघाडी होईल, या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. यामध्ये गंगापूर, वैजापूरमध्ये समाधानकारक तोडगा निघाल्याने येथे अगोदर आघाडी पक्की झाली. मात्र, पैठणमध्ये कोणाला किती जागा द्यायच्या, यावर तोडगा निघाला नाही. पैठणमधील सर्वच नऊ गटांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसकडे इच्छुकांच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे तालुकास्तरावर आघाडी करण्यासाठी तालुकाध्यक्ष इच्छुक दिसत नव्हते. दुसरीकडे भाजप, शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार असल्याने मतविभाजन अटळ आहे. मात्र, या मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे इतर पक्ष, अपक्ष अशा चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी लढती अटळ झाल्या आहेत.

50 गटांत आमने-सामने
शिवसेना, भाजप हे सर्वच गटांत एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटुन आहेत. आता आघाडीची भाषा करणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस 62 पैकी तब्बल 50 गटांत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत कॉंग्रेस पक्षाने 62 पैकी 52 गटांत उमेदवार दिले. तर 124 गणांत 104 उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादीने 62 पैकी तब्बल 51 गटांत उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांत दहा ते अकरा गटांत आमने-सामने लढती होणार आहेत.

गंगापूर, वैजापूर तालुक्‍यांमध्ये आघाडी झाली. कन्नडच्या दोन गटांत आघाडी आहे. मात्र, पैठणमध्ये राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांच्या सर्वच उमेदवारांना बी फॉर्म दिले. त्यामुळे आम्हीही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म दिले. आता उर्वरित गटांत आघाडी होण्याची फारशी आशा नाही.
नामदेव पवार, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

दोन तालुक्‍यांत आघाडी झालेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 62 पैकी 51 गटांत उमेदवार दिले आहेत. उमेदवारांना बी फॉर्म देऊन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील.
आ. भाऊसाहेब पाटील चिकगावकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: Lead 10 groups in congress & ncp