आहे त्या परिस्थितीत जगायला शिका, कोण म्हणाले ते वाचा...

राजाभाऊ नगरकर
Saturday, 4 July 2020

यासाठी रस्त्यावर, ठिकठिकाणची गर्दी टाळणे, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, घरात ज्या वस्तू आहेत त्यावरच जगणे जगायला शिका. असे कळकळीचे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी नागरिकांना केले आहे.

जिंतूर  (जिल्हा परभणी) : कोरोना शहरापासून गाव-चावडीपर्यंत पोहचला असून संक्रमण झपाट्याने वाढते आहे. यावर नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपल्या हाती आहे. यासाठी रस्त्यावर, ठिकठिकाणची गर्दी टाळणे, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, घरात ज्या वस्तू आहेत त्यावरच जगणे जगायला शिका. असे कळकळीचे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण मानव जात अत्यंत गंभीर स्थितीतून मार्गक्रमण करत आहे. अनेक दिवसांपासून सामाजिक जीवन व सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. गोरगरिबांचे तर खूपच हाल होत आहेत हे प्रशासनदेखील जाणून आहे.
तथापि आपण व आपले पारिवारिक सदस्य यांचे जीवितास, कौटुंबिक भविष्यास कुठलाही धोका होवू नये, याची आपण काळजी घ्यावी. तद्वतच पोलिस, महसूल प्रशासन व आरोग्य विभागातील कोरोना योध्यांना खूप व्यापकतेने सहकार्य करणे अगत्याचे झाले आहे, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचाअर्जापूरच्या युवकाचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायीच, कसा? ते वाचलेच पाहिजे

कुटुंबावर नियंत्रण करणे आपले कर्तव्य

कर्फ्यु कालावधीतही काही नागरिक व काही व्यापारी तसेच वाहन चालक जबाबदारीचे भान न बाळगता चोरून लपून व्यापार करणे, रस्त्यावर फिरणे, एकत्र जमून काही गप्पा टप्पा मारत बसणे व पोलिस पथक येताच पळापळ करणे असेही प्रकार दिसून आले आहेत. केवळ पोलिसांच्या येण्याजाण्यामुळे जर आपण धावपळ करत असाल तर हे चुकीचे ठरेल अशा शब्दात समज दिली व आपण आपल्या कुटुंबावर नियंत्रण करणे आपले कर्तव्य आहे हे विसरून चालणार नसल्याचे सांगितले.

येथे क्लिक करा - महिला भजनी मंडळांना ‘या’ बॅंकेचा लाभ...कुठे ते वाचा.

सामाजिक समतोल राखण्याचे दायित्व पोलिसांकडे
परिवर्तन हा काळाचा नियम आहे. तेंव्हा अशी परिस्थिती कायम असूच शकणार नाही, करिता आपण काय छोट्या मोठ्या चुका करतोय व त्याचे आपल्या परिवारावर, गावावर किंबहुना संपूर्ण मानव जातीवर काय परिणाम होतील याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. असे सांगत पोलिसांनी कार्यवाही केली म्हणजे सगळ सुधारेल असेही होत नसते, त्यासाठी कुठेतरी सामाजिक समतोल राखण्याचे दायित्व पोलिसांकडे देण्यात आल्याने त्यांना कार्यवाही करावी लागते त्यात त्यांचाही खूप वेळ जातो. त्याचा परिणाम इतर महत्वाच्या कामकाजावरही होत असतो, याचा सुजाण नागरिक, जबाबदार घटकांनी विचार करावा.

आपणच आपले संरक्षक बना

कोरोना शहरापासून गाव-चावडीपर्यंत पोहचला असून संक्रमण झपाट्याने वाढते आहे. यावर महत्वाचे नियंत्रण करणे आपल्या हाती आहे असे म्हणत आपणच आपले संरक्षक बना, प्रशासनास सहकार्य करा. आपली एखादी छोटीशी चूक उद्याचा पश्र्चाताप ठरू शकते याचा विचार करा. - अशोक घोरबांड, पोलिस निरीक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn to live in that situation, read who said parbhani news