...अन्‌ स्वयंरोजगाराच्या प्रकाशाने उजळले चेहरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

औरंगाबाद - "एलईडी' माळा कशा बनवतात? ते जोखमीचं काम आहे का? आपल्याला ते जमेल का? त्यातून चांगलं अर्थार्जन होईल का? अशा अनेक प्रश्नाचं काहूर मनात घेउन काहीशा साशंकतेनेच त्या पन्नास- साठ जणी एकत्र जमल्या होत्या. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी स्वतः बनविलेल्या माळा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दाखवल्या. त्यांनी बटन दाबताच दिव्यांच्या झगमगाटात साऱ्यांचेच चेहरे आनंदाने उजळून निघाले.

जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित महिलांनी एकमेकींचे कौतुक केले अन्‌ "बहुत अच्छा' या शब्दांत मिळालेल्या आयुक्तांच्या शाबासकीने त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकला. "तनिष्का व्यासपीठ' व पोलिस आयुक्तालय यांच्या वतीने औरंगाबाद शहरातील पोलिस कुटुंबातील महिलांना "एलईडी' माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक दीप शहा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

त्यानंतर माळा बनविण्याच्या साहित्याची माहिती दृकश्राव्य माध्यमातून दिली. बारामती येथून आलेल्या तनिष्कांनी माळा तयार करण्यात मदत करून त्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात महिलांनी अडीच तासांत माळा तयार केल्या, त्याच्या दुरुस्तीबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, शरद इंगळे, सहायक निरीक्षक शामकांत पाटील, उषा घाटे यांनी सहकार्य केले.

पोलिस कुटुंबीयांतील महिलांसोबतच शहरातील अन्य भागातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, त्यांना रोजगार मिळावा हा हेतू आहे. "तनिष्का व्यासपीठा'चा उपक्रम स्तुत्य आहे. पोलिस कुटुंबीयांसाठी एकलव्य योजना असून त्यात उद्योग- व्यवसायासाठी बिनव्याजी अर्थसाहाय्य मिळते. त्यातून पोलिसांच्या कुटुंबीयांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये शहरातील विविध भागांतील महिलांना सहभागी करून त्यांनाही अशा प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. इंदिरानगर येथील महिलांच्या एका गटाने माळा तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद

तनिष्कांनीच दिले प्रशिक्षण
"एलईडी' माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी "ट्रेन दि ट्रेनर' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशिक्षित तनिष्कांनी औरंगाबाद येथील महिलांना प्रशिक्षण दिले. गटप्रमुख ज्योती लडकत, सदस्य कल्पना मेहेर, ज्योती पवार, विद्या गार्डे, कमल शिंदे, बबिता जगताप यांचा समावेश होता.

Web Title: LED lamp tanishka women training