शिवराई शिवारातून बिबट्याने ठोकली धूम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

वैजापूर - शिवराई (ता. वैजापूर) शिवारातून बिबट्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस, गावकऱ्यांना गुंगारा देऊन २८ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धूम ठोकली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस, गावकऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु बिबट्याला पकडण्यात यश न आल्याने पिंजऱ्यासह आलेल्या अधिकाऱ्यांवर शुक्रवारी (ता.२९) माघारी परतण्याची वेळ आली. दरम्यान बिबट्याने तालुक्‍यातील कनकसागज, टाकळीसागजकडे पलायन केल्याने या परिसरातील नागरिकांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे. 

शिवराई येथील संभाजी डांगे यांचे शिवराई-कनकसागज रस्त्यावर शेत आहे. ता. २८ जूनला सायंकाळी पाचच्या सुमारास संभाजी डांगे यांनाच प्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी ही माहिती आसपासच्या शेतकऱ्यांना सांगितल्याने त्यांच्या शेताभोवती ग्रामस्थांनी गराडा घातला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी हातात काठ्या घेऊन पुढे सरसावलेल्या पाच जणांवर बिबट्याने हल्ला चढविला. त्यात ते जखमी झाले. जखमींमध्ये सोन्याबापू बोर्डे (वय २९), जालिंदर आहदे (वय  ४०), प्रवीण डांगे (वय २५) , धनंजय डांगे व आकाश बोर्डे (वय १६) सर्व रा. शिवराई यांचा समावेश आहे. शिवराई शिवारात बिबट्या आल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रथम वैजापूर पोलिस ठाण्याला कळविली. त्यानंतर वैजापूर पोलिस व गावकऱ्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार पोलिसांसह वनविभाग, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर येथून पिंजरा मागविला होता. रात्री बाराच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा पिंजऱ्यासह शिवराई- कनकसागज रस्त्यावरील संभाजी डांगे यांच्या शेतात दाखल झाला. रात्री एकच्या सुमारास बिबट्याने संभाजी डांगे यांच्या शेतातून जवळच असलेल्या विजय डांगे यांच्या शेतात पोबारा केला. रात्री दोनपर्यंत तो याच शेतात ठाण मांडून होता, असे वनविभागाचे म्हणणे आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात मांस टाकून त्याला अडकविण्याची पूर्ण तयारी केली होती; परंतु बिबट्याने सर्वांना गुंगारा देऊन कनकसागज व टाकळीसागज शिवाराकडे धूम ठोकल्याचे सहकार बोर्डाचे संचालक सारंगधर डिके यांनी सांगितले. रात्री दोनपर्यंत शोध घेऊनही बिबट्या न सापडल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिस, गावकऱ्यांना माघारी परतावे लागले. बिबट्याने लगतच्या गावांकडे धूम ठोकल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

Web Title: leopard