बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, नरभक्षक बिबट्याचा आष्टीत उपद्रव सुरूच

अनिरूद्ध धर्माधिकारी
Thursday, 3 December 2020

आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा उच्छाद सुरूच असून आज गुरुवार (ता.तीन) सकाळी बिबट्याने तालुक्यातील सोलेवाडी परिसरात शेतकऱ्यावर हल्ला केला.

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा उच्छाद सुरूच असून आज गुरुवार (ता.तीन) सकाळी बिबट्याने तालुक्यातील सोलेवाडी परिसरात शेतकऱ्यावर हल्ला केला. विकास विठोबा झगडे (वय ६०) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले. आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे ता.२४ नोव्हेंबर रोजी बिबट्याने शेतकऱ्याचा तालुक्यातील पहिला बळी घेतल्यानंतर ता.२७ नोव्हेंबर रोजी किन्ही येथे बालकाचा बळी घेतला.

त्यानंतर शनिवारी (ता.२८) मंगरूळ येथे मायलेकावर हल्ला केला. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२९) बिबट्याने तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सकाळी एका वृद्धेवर जीवघेणा हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास याच गावात बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला. त्यामुळे परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. आज सकाळी बिबट्याने हल्ला केलेले सोलेवाडी हे गाव आष्टीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. पारगाव जोगेश्वरीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडून आष्टीकरांचीही काळजी वाढली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Attack On Farmer In Ashti Block Beed News