माजलगाव तालुक्यात आढळला बिबट्या, शेतकरी धास्तावले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

गुंजथडी येथील शेतकरी संतोष यादव यांच्या शेतात बुधवारी शेजारील शेतगडी खत टाकत असताना त्याला उसात जाताना बिबट्या दिसला. यामुळे तो घाबरून गावाकडे गेला अन् त्याने गावातील नागरिकांना याची माहिती दिली.

माजलगाव (जि. बीड) - गुंजथडी (ता. माजलगाव) शिवारातील शेतात एका शेतकऱ्याला उसाला खत टाकत असताना बुधवारी (ता.१३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला. याची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी शेतातील बिबट्याच्या पायाच्या ठशांचे फोटो काढून वन विभागाला पाठवण्यात आले असून गावात दवंडी देऊन नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गुंजथडी येथील शेतकरी संतोष यादव यांच्या शेतात बुधवारी शेजारील शेतगडी खत टाकत असताना त्याला उसात जाताना बिबट्या दिसला. यामुळे तो घाबरून गावाकडे गेला अन् त्याने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. काही ग्रामस्थांनी महसूल विभागाला याची कल्पना दिल्यानंतर गावाचे तलाठी घटनास्थळावर पोचले.

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

तलाठी राहुल आवारे यांच्यासह गावातील दहा ते पंधरा नागरिकांनी शेतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्या ठशांचे फोटो काढून ते वन विभागाला पाठवले आहेत. धारूर येथील वन विभागाचे अधिकारी गुरुवारी (ता.१४) गुंजथडी येथे येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे गावात प्रशासनातर्फे दवंडी देऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांतही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard found in Majalgaon taluka, farmers panicked