कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात बिबट्याचा वावर 

संजय कापसे 
Tuesday, 29 December 2020

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कांडली बऊर शिवारात मंगळवारी (ता.२९) एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कांडली बऊर शिवारात मंगळवारी (ता.२९) एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. आढळून आलेल्या पायांच्या ठश्यावरून तो बिबट्या नसल्याचे वनविभागाकडुन सांगितले जात आहे. तो तडस किंवा लांडगा असल्याचे सांगितले जात आहे. 

कांडली येथील शेतकरी देविदास नरवाडे हे मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. शेतात गवत कापत असताना त्यांना अचानक बिबट्या समोर दिसला. त्यामुळे ते घाबरून पळून गेले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती गावात सांगितली. बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 

हेही वाचा - फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर : रामदास आठवले -

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल 
दरम्यान, राहुल पतंगे यांनी वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनाधिकारी नरसिंग तोलसरवार यांच्यासह पथकाला घटना स्थळाजवळ व काही अंतरावर प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या ठश्यांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो प्राणी बिबट्याच आहे काय याची खात्री केली जात आहे. कांडली व बऊर शिवारात प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्या ठिकाणीही वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. 

हेही वाचा - चारित्र्यहिन म्हणत अत्याचार पीडित महिलेला गावाने नाकारला प्रवेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

तो वन्य प्राणी तडस असावा 
श्री.टाक यांनी तो प्राणी बिबट्या नसुन त्याच्या पायाच्या ठश्यावरुन तडस असावा असे सांगितले. याबाबत गावात बैठक घेऊन शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये असे गावकऱ्यांना सांगितले आहे. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard roaming in Kandli Shivara of Kalamanuri taluka, Hingoli News