बहुजन समाजासाठी लढणाऱ्या उमेदवाराला पहिली पसंती द्या - सतीश चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

जळकोट - जातियवादी पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करता बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला पहिल्या पंसतीचे मत देण्याचे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी (ता. 28) केले.

जळकोट - जातियवादी पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करता बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला पहिल्या पंसतीचे मत देण्याचे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी (ता. 28) केले.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी शहरातील तिरुमल्ला अध्यापक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते.
या वेळी मन्मथ किडे, अर्जुन पाटील, अशोक डांगे, दगडोजी चव्हाण, रामदास चव्हाण, रामदास पवार, शहाजी पवार, प्राचार्य पस्तापुरे, विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, की आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या हक्‍कासाठी अनेक आंदोलने केली. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या हिताचे अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. विक्रम काळे यांच्या प्रयत्नांमुळे विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द वगळण्यात आला, ज्युनिअर कॉलेजचे प्रश्न सोडविण्यात आले, महिलांना प्रसूतिकालीन रजेसंदर्भातही त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली.

आघाडीच्या सत्ताकाळात विक्रम काळे यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले. शिक्षकांच्या हक्‍कासाठी सत्तेच्या काळात विधिमंडळासमोर धरणे धरली. आमदार असताना किंवा नसताना वसंतराव काळे यांनी काम केले आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार विक्रम काळे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांनी काळे यांनाच पहिला पसंतीक्रम देण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

भाजपने किती घोषणा केल्या आहेत, त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी झाली हे तपासून पाहा, असा सल्लाही श्री. चव्हाण यांनी या वेळी दिला. अध्यक्षीय समारोप श्री. किडे यांनी केला.

या कार्यक्रमाला तालुक्‍यातील शिक्षक मतदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Let's first choice for those candidates Bahujan Samaj