Udgir News : उदगीरच्या लिंकन स्कूलमध्ये सीईटी परीक्षेत गोंधळ; जनरेटर असूनही एक तास लाईट गुल

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोमवारी (ता. २२) रोजी घेण्यात आलेल्या बारावी सीईटी परीक्षेत येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यात लाईट गेल्याने गोंधळ उडाला.
Lincoln international school udgir
Lincoln international school udgirsakal

उदगीर, (जि. लातुर) - महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोमवारी (ता. २२) रोजी घेण्यात आलेल्या बारावी सीईटी परीक्षेत येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यात लाईट गेल्याने गोंधळ उडाला. विशेष म्हणजे या शाळेत जनरेटरची सुविधा असून सुद्धा तब्बल पाऊण तास परीक्षेत खंड पडल्याने परीक्षा उशिरा चालू झाल्या. त्यामुळे राज्यातील विविध भागातून आलेल्या पालकासह विद्यार्थ्यीही संभ्रमात पडले.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र सीईटी सेलच्या वतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पीसीबी व पीसीएम ग्रुपच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी निडेबन (उदगीर) येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल या केंद्रावर १०० मुलांची परीक्षा चालु असताना दुपारच्या सत्रात अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संगणक शट डाऊन झाल्याने गोंधळ उडाला.

सुमारे पाऊण तासानंतर जनरेटर सुरू करून परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. परंतु काही विद्यार्थ्यांच्या संगणकामध्ये तांत्रिक समस्या आल्याने संगणक सुरू होण्यास वेळ लागला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा रात्री सव्वा सात वाजेपर्यंत परीक्षा घेण्यात येत होत्या.

उदगीर शहरातील निडेबन येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल येथे सीईटी परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर सकाळ व दुपार अशा दोन सत्रात परीक्षा घेण्यात येत आहेत. यात एका सत्रात शंभर मुलं आहेत. यातील अनेक मुले नाशिक यवतमाळ जिल्ह्यातून परीक्षा देण्यासाठी आलेली होती मात्र येथील परीक्षा केंद्रावरील दिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या लिंकन इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर यावर्षी प्रथमच परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र येथे उपलब्ध असलेली साहित्य सामुग्री व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी पूर्ण असल्याशिवाय येथे मान्यता देण्यात आली कशी? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे येथे जनरेटरची सुविधा असूनही जनरेटर चालक वेळेवर उपस्थित नसल्यामुळे पाऊण तास परीक्षेत खंड पडला.

प्रतिक्रिया

या परीक्षा केंद्रावर आमच्या मुलांची प्रचंड गैरसोय झाली. दोन वेळा लाईट गेल्याने दोन वेळा विद्यार्थी डिस्टर्ब झाले जनरेटर मध्ये डिझेल नसल्यामुळे जनरेटर पाऊण तास सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे कम्प्युटर शट डाऊन झाले परत लॉगिन करण्यासाठी एक ते दीड तास वेळ गेल्याने विद्यार्थ्यांनी या मानसिकतेवर निश्चितपणे परिणाम झाला आहे

- गफुर शेख, पालक, लातुर.

या केंद्रावर वारे वादळ सुटल्याने लाईट गेली होती. विद्यार्थ्यांना बराच वेळ लाईटची वाट बघावी लागली. ज्यावेळी जनरेटर चालू झाले त्यावेळी पासून विद्यार्थ्यांना वेळ देऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. जनरेटरची व्यवस्था आहे का नाही बघायची माझी जबाबदारी नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला नाही.

- प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे. परीक्षा केंद्र निरीक्षक, उदगीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com