esakal | कळमनुरीत अनुदानासाठी बँकेत लाभार्थींच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

pradhanmantri jandhan yojana

पंतप्रधान जनधन योजनेमध्ये बँकेत खाते उघडलेल्या महिलांच्या नावे व उज्ज्वला गॅस योजनेमधून मिळणारी सबसिडी लाभार्थींच्या नावे बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच लाभार्थींनी बुधवारी (ता. आठ) बँकेसमोर मोठी गर्दी करून रांगा लावल्या.

कळमनुरीत अनुदानासाठी बँकेत लाभार्थींच्या रांगा

sakal_logo
By
संजय कापसे/विनायक हेंद्रे

कळमनुरी( जि. हिंगोली) : पंतप्रधान जनधन योजनेमध्ये बँकेत खाते उघडलेल्या महिलांच्या नावे व उज्ज्वला गॅस योजनेमधून मिळणारी सबसिडी लाभार्थींच्या नावे बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच लाभार्थींनी बुधवारी (ता. आठ) बँकेसमोर मोठी गर्दी करून रांगा लावल्या. या वेळी सुरक्षित अंतर पाळा, असे वारंवार सांगताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले.

पंधरा दिवसांपासून पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तावर तैनात आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, नागरिकांनी सुरक्षित अंतर पळावे यासाठी प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्या गैरहजेरीत सोशल डिस्टन्सची बंधने पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचासिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा

सबसिडी बँकेत जमा

शासनाने पंतप्रधान जनधन योजनेनेतील महिला लाभार्थींच्या खात्यात पाचशे रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उज्ज्वला गॅस योजनेमधून लाभार्थींना मिळणारी सबसिडी बँकेत जमा झाल्यानंतर लाभार्थी महिला व नागरिकांनी बँकेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. 

नियम पाळले जात नसल्यामुळे अडचणी

पंतप्रधान जनधन योजनेमध्ये तालुक्यातील २२ हजार नागरिकांच्या खात्यावर शासनाकडून देण्यात येणारी मदत जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात पैसे काढण्यासाठी बँकेत येणाऱ्या लाभार्थींची संख्या वाढणार आहे. त्यातच बँकेच्या बाहेर रांगा लावताना नागरिकांकडून कुठलेही नियम पाळले जात नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गर्दी ठरतेय चिंतेचा विषय 

 बुधवारी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबाहेर लाभार्थींनी केलेली गर्दी पाहता उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे, कर्मचारी नंदू मस्के, कैलास सातव, निकी उरेवार यांनी सुरक्षित अंतरासाठी चुन्याने जागा आखून देण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच लाभार्थींना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यास भाग पाडले. दरम्यान, बँकासमोर होणारी लाभार्थी नागरिकांची गर्दी प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाली आहे.

आखाडा बाळापुरात सोशल डिस्‍टन्सचा वापर

आखाडा बाळापूर : येथे शिधापत्रिकाधारकांना स्‍वतधान्य दुकानांमार्फत एक महिन्याचे धान्य वाटप सुरू असून त्‍यासाठी दुकानावर सोशल डिस्‍टन्सचा वापर केला जात आहे. मात्र, तीन महिन्यांचे जाहीर केलेले धान्य कधी वितरीत होणार आहे, असे लाभार्थी विचारत आहेत.

लाभार्थींना महिन्याचे धान्य वाटप

शासनाने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील आदेशही शासनाने काढले होते. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्याच्या धान्याचे चलन भरून टाकले होते. मात्र, शासनाकडून महिन्याचे धान्य पुरविण्यात आले.

येथे क्लिक कराहिंगोलीत पहिल्याच दिवशी पावणे दोन लाखाची मदत

अंतर ठेवून धान्याचे वाटप

आखाडा बाळापूर येथे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत धान्य वाटपाला सुरवात करण्यात आली आहे.
 दुकानावर एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी दुकानदारांनीही डिस्टन्स ठेवण्यासाठी आवश्यक त्या खुणादेखील केल्या आहेत. दोन ग्राहकांमध्ये किमान तीन फूट अंतर ठेवून धान्याचे वाटप केले जात आहे. 

दोन महिन्याचे धान्य वाटप करा

स्वस्त धान्य वाटप करतानाही शिधापत्रिकाधारकांकडून उर्वरित दोन महिन्याचे धान्य कधी वाटप होणार, अशी विचारणाही केली जाऊ लागली आहे. सध्यातरी आखाडा बाळापूर येथे पाच पैकी तीन स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरीत करण्यास सुरवात केली असून उर्वरित दोन दुकानदार धान्य कधी वितरीत करणार, असा सवाल शिधापत्रिकाधारकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.