लिंगायत धर्ममान्यतेसाठी लढतच राहू - राजेंद्र वांजुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

आठ एप्रिलला औरंगाबादेत होणाऱ्या मोर्चात समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.

औरंगाबाद - लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असुन या धर्माच्या संविधानिक मागणीसाठी देशभर लढा उभारला जात आहे. त्यासाठी एकसंघपणे व लोकशाही मार्गाने आपण लढतच राहू. आठ एप्रिलला औरंगाबादेत होणाऱ्या मोर्चात समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.

श्री . वांजुळे म्हणाले, "शैक्षणिक सामाजिक आर्थिक तसेच राजकीय प्रतिनिधीतत्वापासून समाज अद्यापही दूर आहे. 1872 ते 1931 च्या जातवार, धर्मवार जनगणनेत लिंगायत एक स्वतंत्र धर्म होता. 1947 नंतर मात्र लिंगायतांसह जैन, शिख हे धर्म हिंदू धर्मात समाविष्ट केले गेले. परंतु कालांतराने शीख व जैन समाजाला धर्ममान्यता मिळाली.
लिंगायत धर्माला स्वातंत्र्य पुर्वकाळात संविधानिक मान्यता होती. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर 1951 ला लिंगायत धर्माची शासकीय मान्यता रद्द केली गेली.''

6 कोटी संख्या असूनही लिंगायतांना आज धर्म मान्यता नाही. पर्यायाने आमचे वैदिकीकरण झाले. ज्या विषमतावादी सनातनी व्यवस्थेला आम्ही झुगारले, पुन्हा आम्हाला त्याच व्यवस्थेचा घटक बनविण्यासाठी आमची धर्ममान्यता काढण्यात आली. पण आज लिंगायत साहित्यिकामुळे, संशोधक तसेच कलबुर्गीं यांच्या बलिदानामुळे, चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे व वचनसाहित्याच्या प्रचार-प्रसारामुळे समाजाला अस्तित्वाची जाणीव होत आहे. या जाणिवेतूनच लिंगायत धर्ममान्यतेच्या आंदोलनाचा जन्म झाला असुन हा महामोर्चा कुठल्याही पक्षाच्या, जातीधर्माच्या व समुहाच्या विरोधात नाही. म्हणूनच अतिशय सकारात्मक व संवादात्मक असणाऱ्या आंदोलनास सर्व समविचारी जातीसमुह संघटनांसह एटरधर्मीयांचा पाठिंबा मिळत असल्याचे आजपर्यतच्या विविध राज्यातील महामोर्चातून दिसत आहे. त्यामुळे 8 एप्रिल ला औरंगाबाद येथे होणाऱ्या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. वांजुळे यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Lingayat community committees member rajendra vanjule