लिंगायत समाज 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धुळ खात पडून आहे. सरकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. लिंगायत समाजाचे 16 ऑगस्टपासून राज्यभर ही आंदोलने होणार आहेत. तशी घोषणा लिंगायत महासंघाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.

लातूर : राज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धुळ खात पडून आहे. सरकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. लिंगायत समाजाचे 16 ऑगस्टपासून राज्यभर ही आंदोलने होणार आहेत. तशी घोषणा लिंगायत महासंघाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.

आरक्षणासाठी मराठा, धनगर समाजाचे सध्या राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मुस्लिम समाज 10 ऑगस्टपासून जेल भरो आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यानंतर आता लिंगायत समाजानेही 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिली नाही. पुढील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 16 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरवात होईल, असा निर्णय महासंघाने पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला आहे.

लिंगायत महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यावेळी म्हणाले की, ‘आघाडी सरकारने 2014 मध्ये लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना आरक्षण दिल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात ज्यांना पूर्वी आरक्षण होते त्यांनाच आरक्षण जाहीर केले. नंतरच्या सरकारकडे लिंगायत समाजाने आपली अरक्षणाची मागणी कायम ठेवली; पण सरकारने प्रत्येकवेळी पुढची आशा दाखवून किंवा आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.’’ मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला लिंगायत समाजाचा पाठींबा आहे, असेही ते म्हणाले.

आश्वासन दिले; पण पूर्ण केले नाही
वाणी नावाला असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी वाणी आणि लिंगायत हे एकच असल्याचे शुद्धीपत्रक सरकारने प्रसिद्ध करावे लागेल. तशी आमची मागणी सरकारकडे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी 27 एप्रिल 2018 रोजी सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यात लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवू, अशी घोषणा केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही सरकार दरबारी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे लिंगायत समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे, असेही प्रा. बिरादार यांनी सांगितले.

Web Title: Lingayat society will be on the road from August 16