लॉकडाउनचा फटका: टोमॅटो पिकात सोडली जनावरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

कोरोनामुळे खरेदीसाठी ग्राहक नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ आली. नांदेड येथे पीकअप भरून चाळीस कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी नेला असता केवळ दोन रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकला गेला.

वारंगा फाटा(जि. हिंगोली): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधित फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उत्पादित झालेला शेतमाल विक्री करण्यात अडथळे येत असल्याने दांडेगाव(ता. कळमनुरी) येथील शेतकऱ्यांने टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहेत.

दांडेगाव येथील भगवानसिंग ठाकूर यांनी सव्वा एकरात ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. यासाठी रोप लागवड, तीन वेळा खत देणे, दोन ते तीन फवारण्या व इतर लागवडीचा जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला.

हेही वाचाधक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

पीक जोमदार बहरले

 पाणी व्यवस्थापन करण्यासाठी शेतातील संठिबक वापरलं. शेतात केलेल्या मेहनतीला फळ आलं. त्यामुळे पीक जोमदार बहरले. टोमॅटो विक्रीतून खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची कसर भरून निघेत असे वाटत होते. तोच कोरोनाने धुमाकूळ घातला.

टोमॅटोला केवळ दोन रुपये भाव

 कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ ठप्प पडली. उत्पादित झालेला माल शेतातच राहिला. खरेदीसाठी ग्राहक नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ आली. नांदेड येथे पीकअप भरून चाळीस कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी नेला असता केवळ दोन रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकला गेला.

जणावरे सोडण्याचा निर्णय 

 त्यामध्ये सदरील वाहनाचा किरायादेखील निघाला नाही. विक्रीतून आलेल्या पैशातून किरायाही निघाला नसल्याने वाहन चालकाने किरायासुद्धा घेतला नाही. त्यानंतर वैतागून श्री. ठाकूर यांनी उभ्या पिकात जणावरे सोडण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन नसते तर किमान एक ते सव्वा लाख रूपयाचे उत्पादन निघाले असते. मात्र कोरोनाने सर्व स्वप्न धुळीस मिळाल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

शेततळ्यातील पाण्यावर फुलवली आमराई

वसमत : तालुक्यातील हयातनगर येथील एका शेतकऱ्याने शेततळ्यातील पाण्याचा उपयोग करून दोन एकरातील आमराई फुलविली. हयातनगर येथील शेतकरी शिवराम दामाजी सोळंके यांना सात एकर शेती आहे. त्‍यांनी दोन एकरात पाच ते सहा वर्षापूर्वी आंब्याची झाडे लावले आहेत. 

येथे क्लिक कराकळमनुरीत दुकानाला आग, लाखोंची नुकसान

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता

पूर्वी त्यांच्याकडे विहीर व बोअरवेल होता. या माध्यमातून ते आंब्याची बाग भिजवित असत. परंतु, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवत शासनाच्या कृषी विभागातून शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. तो अर्ज मंजूर झाला. त्‍यांनतर नोव्हेंबर २०१९ मध्ये शेततळे पूर्ण केले.

झाडे वाळून गेली

 त्यात त्यांनी विहिरीचे व बोअरवेलचे पाणी टाकून साठवणूक केली. या पाण्यातून त्यांनी आंब्याची व जांबाची झाडे जोपासली. गतवर्षी पाण्याअभावी त्यांची झाडे वाळून गेली. पंरतु, शेततळ्याच्या आधाराने त्यांची आंब्याची बाग फुलली आहे.

दोनशे‌ झाडे लावली

सहा ते सात वर्षा पूर्वी दोनशे‌ झाडे लावली होती. परंतु सध्या त्यातील ७० ते ८० झाडे जीवंत आहेत. ही झाडे जगविण्यासाठी कृषी विभामार्फत शेततळे घेतले आहे. त्‍यात पाणी साठवून आंब्याची जोपासणा केली जात आहे.
- शिवराम सोळंके, शेतकरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Animals released in tomato crop Hingoli news