esakal | लॉकडाउनचा फटका : कष्टाने पिकविलेल्या टरबुजाला एक रुपया भाव
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जिल्हा प्रशासन दररोज नवीन आदेश काढत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाउनमुळे श्री. मोरे यांना भाजीपाल्याची विक्री करता आली नाही. तसेच टरबूज रुपयाच्या भावात विकण्याची वेळ आली आहे. 

लॉकडाउनचा फटका : कष्टाने पिकविलेल्या टरबुजाला एक रुपया भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. जिल्हा प्रशासन दररोज विविध आदेश काढत असल्याने शेतकरीदेखील त्रस्त झाले आहेत. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतमाला विक्रीस अडचणींचा सामाना करावा लागत आहे. तालुक्‍यातील वरुड गवळी येथील एका शेतकऱ्याला रुपयाला एक याप्रमाणे बाराशे रुपयांत बाराशे टरबूजाची विक्री करावी लागली.

हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी येथील शेतकरी शांताराम मोरे यांच्याकडे वडिलोपार्जित असलेल्या शेतीत ते पारंपरिक पिके घेतात. त्याच्याकडे पाण्याची व्यवस्‍था असल्याने त्‍यांनी या वर्षी दीड हेक्टर शेतीमध्ये भाजीपाला व टरबुजाची लागवड केली आहे.

हेही वाचा पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा

भाजीपाला पूर्णपणे सडला

 मात्र, कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउनने शेतकऱ्यांसमोर संकटे निर्माण केली. त्यात जिल्हा प्रशासन दररोज नवीन आदेश काढत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाउनमुळे श्री. मोरे यांना भाजीपाल्याची विक्री करता आली नाही. परिणामी भाजीपाला पूर्णपणे सडला आहे. 

बाराशे रुपयांत बाराशे टरबुज

तसेच आता त्‍यांच्याकडे असलेले टरबूज तोडणीस आले आहे. मात्र, त्‍याची विक्री करताना करावा लागत असलेल्या अडचणींमुळे त्यांनी व्यापाऱ्याला कवडीमोल भावाने विक्री करण्याचा निर्णय घेतला. श्री. मोरे यांच्या शेतातून व्यापाऱ्याने चक्क एक रुपयाला प्रति नग या भावाने बाराशे रुपयांत बाराशे टरबुजांची खरेदी केली. 

लागवडीसाठी बारा हजार रुपये खर्च

यात टरबूजाची तोडणीही शेतकऱ्यालाच करावी लागली. त्यामुळे श्री. मोरे यांनी मुलाबाळांसह टरबुजांची तोडणी केली. टरबूज लागवडीसाठी बारा हजार रुपये खर्च आला. तर हाती बाराशे रुपयांचे उत्पन्न आले.

बाजारात जाण्यासाठी अडचणी

भाजीपाला व टरबुजाची दीड हेक्‍टरमध्ये लागवड केली आहे. लॉकडाउनमुळे जवळपास दीड महिन्यापासून भाजीपाला तोडणीअभावी जागेवरच सडून गेला आहे. त्‍यानंतर टरबूज तोडणीस आले. मात्र, बाजारात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. व्यापारीदेखील खरेदी करण्यास तयार होईनात. एका व्यापाऱ्याला एक रुपयाला नग या प्रमाणे बाराशे टरबुजांची विक्री केली. टरबूज लागवडीसाठी बारा हजारांचा खर्च आला होता.
-शांताराम मोरे, शेतकरी

 

चहा, पानटपरी व्यावसायिक अडचणीत

केंद्रा बुद्रुक (ता. सेनगाव): जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. याचा फटका फेरीवाले, चहा विक्रेते व पानटपरी चालकांना बसला आहे. कुटुंबीयांच्या उदरनिवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी यासह दिवसाआड जीवनावश्यक वस्‍तूंची विक्री करणारे दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू आहेत. परंतु, हॉटेल, पानटपरी दुकाने मात्र बंद आहेत. 

येथे क्लिक करा औंढा नागनाथ संस्‍थानचा कारभार प्रशासकांच्या हाती

वाहतूकदेखील बंद

मात्र, ही दुकानेच बंद असल्याने त्‍यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्‍थित झाले आहेत. अनेक गावांतील बस थांब्यावर चहा, पानटपऱ्या आहेत. मात्र, बससेवा व खासगी वाहतूकदेखील बंद असल्याने बसस्‍थानकाकडे फिरकण्यास कोणी तयार नाही. बंदच्या काळात संचारबंदीमुळे घराबाहेर पडणेदेखील बंद झाल्याने हे सर्वच व्यवहार बंद झाले आहेत. 

मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम

यासह गावात काही विक्रेते विविध वस्‍तूंसह फळे घेऊन येतात. त्‍यांचादेखील व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्‍यातच या वर्षीची लग्नसराईदेखील कोरोनाच्या संकटामुळे बंद झाल्याने छोट्या व्यावसायिकांसह मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम झाल्याने आर्थिक अडचणींना सोमोरे जाण्याची वेळ येत असल्याचे चित्र केंद्रा बुद्रुक परिसरात आहेत.